ठळक बातम्या

सेंच्युरियन कसोटी : पहिल्या दिवसावर भारताचा दबदबा

  • के. एल. राहुलचे दमदार शतक

सेंच्युरियन – के. एल. राहुलचे दमदार शतक व मयांक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने रविवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद २७२ धावा साकारल्या. राहुलने २४८ चेंडूंत १७ चौकार व एक षटकाराच्या मदतीने नाबाद १२२ धावा केल्या असून, अग्रवाल (१२३ चेंडूंत ६० धावा)सोबत पहिल्या विकेटसाठी ११७, कर्णधार विराट कोहली (३५)सोबत ८२ व अजिंक्य रहाणे (८१ चेंडूंत नाबाद ४०, आठ चौकार) सोबत चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत भारताचे पारडे पहिल्याच दिवशी जड राखले. राहुलची ही खेळी दक्षिण आफ्रिकेतील एखाद्या भारतीय फलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सत्रात लुंगी एनगिडी (४५ धावा तीन विकेट) ने सलग दोन विकेट घेत पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक वेळ यजमान संघाचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यास अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या दिशाहीन गोलंदाजीचा त्यांना तोटा सहन करावा लागला.
सकाळच्या सत्रात जास्त शॉर्ट पिच चेंडू फेकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रात मात्र सर्वोत्तम कामगिरी करताना स्टम्पवर निशाणा साधला. अशात लंचनंतर अर्धशतक पूर्ण करणारा मयांक अग्रवालला लुंगी एनगिडीने पायचित करत दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. अग्रवालने १२३ चेंडूंचा सामना करत नऊ चौकार ठोकले. तो व शतक झळकावणारा के. एल. राहुल दक्षिण आफ्रिकेत २१ सामन्यांच्या कालावधीत शतकीय भागीदारी रचणारी भारताची तिसरी जोडी ठरली. एनगिडीने चेतेश्वर पुजाराला मात्र याच षटकात खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर राहुलने सावरून खेळत कर्णधार विराट कोहलीला चांगली साथ दिली. अगोदर राहुलने १२७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मधल्या काळात विराटनेही चांगल्या खेळीचा नजराणा दाखवला. अनेक महिने अर्धशतकीय खेळी करण्यापासून वंचित असलेल्या विराटने चहापानानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केले. हा देखील एनगिडीचाच शिकार ठरला. ९४ चेंडूंत चार चौकारासह ३५ धावा करणाऱ्या विराटला एनगिडीने मुलडरकरवी झेलबाद केले. विराटने राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने संयमी, पण खराब चेंडूवर चौकार ठोकण्याची आपल्यातील कला पुन्हा एकदा जगासमोर मांडली. अखेरच्या सत्रात केशव महाराजला चौकार ठोकत राहुलने २१४ चेंडूंत आपले शतक साजरे केले. दक्षिण आफ्रिकेत शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. याआधी २००६/०७ सत्रात केप टाऊनमध्ये वासिम जाफरने सलामीला येत ११६ धावांची खेळी केली होती. त्याआधी विराटने खेळपट्टीवर गवत असतानाही नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा साहसी निर्णय घेतला. खेळपट्टी जशी जुनी होईल, तशी ती वेग पकडेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अनुकूल परिस्थितीत अचूक लाइन व लेंग्थसह गोलंदाजी केली नाही, ज्याचा फायदा भारतीय फलंदाजांनी उचलला. अग्रवाल व राहुलने सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमण पुकारले होते. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज सुरुवातीपासूनच दबावात दिसले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …