अल अमेरात – बांगलादेशसारख्या बळकट संघाला पराभूत केल्यानंतर उत्साहात असलेला स्कॉटलंड संघ ओमानविरुद्ध गुरुवारी येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या ‘ब’ गटाच्या सामन्यात विजयी मोहीम कायम राखत सुपर-१२ मध्ये पोहचण्याचा प्रयत्न करेल.
स्कॉटलंडने बांगलादेशनंतर पापुआ न्यू गिनीचा १७ धावांनी पराभव केला. त्यांनी एकप्रकारे सुपर-१२ गाठलेले आहे. ओमानला मात्र सुपर-१२ गाठण्यासाठी स्कॉटलंडला पराभूत करावेच लागेल, पण त्यांचा पराभव झाला, तर बांगलादेश पापुआ न्यू गिनीचा पराभव करत सहज सुपर-१२ गाठू शकतो. पापुआ न्यू गिनी या स्पर्धेतून अगोदरच बाहेर पडला असून ‘ब’ गटातील तीन संघ स्कॉटलंड, ओमान व बांगलादेश दुसऱ्या फेरीत पोहचण्याच्या शर्यतीत आहेत. स्कॉटलंड गटात अव्वल स्थानी असून ओमानवरील विजयाने तो अव्वल स्थान आपल्याकडेच राखेल, पण जर पराभूत झाला व दुसरीकडे बांगलादेशने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवला, तर तिघांचेही ४ गुण होतील व धावगतीच्या आधारे अव्वल दोन संघ पुढील फेरी गाठतील. या तिघांत ओमानची धावगती ०.६१३ सर्वात चांगली आहे. त्यामुळे सुपर-१२ गाठण्यासाठी त्यांना फक्त विजय हवाय. पण ओमानसाठी स्कॉटलंडवर विजय मिळवणे सोप्पे नसेल, त्यांची धावगती सध्या ०.५७५ आहे. बांगलादेशची धावगती ०.५०० आहे व ओमानी त्यांच्यावर मोठ्या अंतराने विजय मिळवला तर स्कॉटलंडवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका आहे. स्कॉटलंडचा कर्णधार काइल कोएत्झरने आपल्या खेळाडूंना बळकट केले आहे. फलंदाजी व गोलंदाजीत त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. रिची बॅरिंग्टन व कॅलम मॅकलॉयडसारखे खेळाडू संघात आहेत. मॅकलॉयडला ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. कोएत्झर, मॅथ्यू क्रॉस व अष्टपैलू क्रिस ग्रीव्सच्या उपस्थितीत स्कॉटलंडची फलंदाजी बळकट दिसते. गोलंदाजी विभागात त्यांच्याकडे सफयान शरीफ, जॉश डॅवी, ब्रॅड व्हील व अलॉय इवान्स आहेत. यजमान ओमानने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवत स्पर्धेला सुरुवात केली. पण बांगलादेशविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तिन्ही विभागांत चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजीत ओमानची जबाबदारी जतिंदर सिंग व आकिब इलियास या सलामी जोडीवर असेल, तर गोलंदाजीत फयाज बट, बिलाल खान व कर्णधार जीशान मकसूदवर फलंदाजांवर अंकुश लावण्यासह विकेट मिळवण्याची जबाबदारी असेल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.