बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्या काळी आपल्या दमदार अभिनयाने रूपेरी पडदा गाजवला होता. अभिनय कलेसोबत अतिशय देखणे रूप लाभलेल्या राजेश खन्ना यांनी लाखो तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले होते. आता चित्रपट निर्माते निखिल द्विवेदी यांनी राजेश खन्ना यांच्यावर बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. निखिल द्विवेदी यांनी गौतम चिंतामणी यांचे पुस्तक डार्क स्टार द लोनलीनेस ऑफ बिइंग राजेश खन्नाचे हक्क खरेदी केले असून, लवकरच कोरिओग्राफर फराह खान राजेश खन्ना यांच्या बायोपिकवर काम सुरू करण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात निखिल द्विवेदी यांनी सांगितले की, मी गौतम चिंतामणी यांचे पुस्तक डार्क स्टार द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना हे एका चित्रपटात रूपांतरित करण्याचे सर्व अधिकार खरेदी केले असून, हा चित्रपट बनवण्यासाठी फराह खानशी चर्चा सुरू आहे. तूर्तास तरी एवढेच सांगू शकतो. ज्यावेळेस या चित्रपटाबद्दल एखादी मोठी घोषणा होईल, तेव्हा आपल्याबरोबर नक्कीच शेअर करेन. मी राजेश खन्ना यांची बायोपिक मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी खूप उत्साहित आहे.
तर कोरीओग्राफर फराह खान म्हणाली, ‘हो, मी गौतमचे पुस्तक वाचले आहे. ते खूप शानदार आहे आणि खूपच रोमांचक कथा आहे. आमची यावर चर्चा सुरू आहे, परंतु यापेक्षा अधिक मी काही सांगू शकत नाही.’
आता राजेश खन्ना यांच्यावर बायोपिक येणार असल्याचे कळल्यापासून त्यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार हे जाणून घेण्यास सर्व उत्सुक आहेत, परंतु बॉलीवूडच्या पहिल्या सुपरस्टारची भूमिका साकारणे खूप कठीण आहे. राजेश खन्ना यांना प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळणारे प्रेम हे खूप वेगळे आणि अचंबित करणारे होते. त्यांच्याविषयी लोकांमध्ये इतकी क्रेझ होती की, महिला चाहत्या त्यांना रक्ताने लिहिलेल्या चिठ्ठ्या पाठवित असत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आनंद, रोटी, कटी पतंग, दुश्मन, मेरे जीवन साथी, नमक हराम, आन मिलो सजना यांसारखे १७ ब्लॉकबस्टर चित्रपट केले होते.