ठळक बातम्या

सुखी व आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र

आपण सर्वसाधारण मनुष्यप्राणी आहोत. भाव, भावना, राग, लोभ यांच्या आहारी जातोच. त्यामुळे कायम आनंदी आणि उत्साही राहू अशी अपेक्षा ठेवू नका. जे आहे त्यात समाधान मानायला शिका. उगाच अपेक्षांचे ओझे डोक्यावर नको. आपल्या कामात आनंद शोधा, जेणेकरून जीवन सुखकर होईल.

सुखी आयुष्याचे एकमेव सूत्र म्हणजे आपले आयुष्य जसे आहे, तसे स्वीकारावे. वाईट प्रसंगांच्यावेळी आपल्यापेक्षा वाईट स्थितीत असलेल्यांना पाहावे. आनंदी काळातही त्यांच्याकडे पाहिल्यास आपण किती सुखी आहोत, हे लक्षात येते. आपण इतरांशी विनाकारण आपल्या आयुष्याची तुलना करून आपले जीवन गुंतागुंतीचे करतो. आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या बाबींचा विचार केल्यास आपले जीवन सुखी होण्यास मदत होईल.
आपण जर सतत वाईट बाबींचा विचार करत बसलो, तर ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळे दिसते, त्याचप्रमाणे दु:खी माणसाला सर्व जग दु:खी दिसते. म्हणूनच आनंदी व सुखी होण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे स्वत:च्या दु:खाचा विचार सोडून दुसºयांच्या दु:खाचा विचार करणे व ते कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे.

दु:खात उद्विजते सर्व: सर्वस्य सुखम इप्सितम। असा एक श्लोक महाभारतामध्ये शांतीपर्वात दिला आहे. सर्वांनाच दु:ख नकोसे वाटते व सर्वांनाच सुख हवेसे वाटते, असा त्याचा अर्थ आहे. आपण कधी-कधी पुढे जाण्याच्या स्पर्धेत धोका, कपट, देखावा यांचा आसरा घेतो. खरे तर हे सर्व काम आपण आपल्या आनंदासाठी करत असतो; पण इतके करूनही शेवटी आपल्या पदरात दु:खच येते. कारण तो रस्ता चुकीचा असतो. याऐवजी सरळ जीवन जगले, तर आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते.
यामुळे आपोआप माणूस सुखी व आनंदी होतो. याउलट दुस‍ºयावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवले, तर विनाकारण मनावरील ताणतणाव वाढतो. म्हणून वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा. मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे गरजेचे असते. यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते.

मनात कपट असणा‍ºया व्यक्ती नेहमी काळजीत असतात. कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो. यातूनच त्यांना आपले बिंग फुटते की काय, याची भीती वाटत राहते. यातून मनावरील ताणतणाव वाढून दु:ख वाट्याला येते. एकंदरीत सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या हव्यासावर नियंत्रण मिळवून जसे आहे तसे आपले जीवन स्वीकारावे. पुढे पुढे जाण्यासाठी प्रयत्नवादी नक्कीच असावे, पण यात अपयश आल्यास, दु:खी न होता व दुसºया कोणावरही न चिडता मार्ग काढावा. आपल्या संतांनी सांगितलेच आहे ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हाती काम आणि मुखी नाम असेल, तर डोक्यात काही वाईट विचार येत नाही. मन फार चंचल आहे, त्याला कामात गुंतवले पाहिजे हे मात्र तितकेच खरे! शेवटी सुख आणि समाधान हे आपल्या मानण्यावर अवलंबून आहे.
– बाळासाहेब हांडे / 9594445222\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …