सीएनजी महागला; टॅक्सीचालक संपाच्या तयारीत

मुंबई – गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या किमतीत तीन वेळा वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड टॅक्सीचालकांना पडत आहे. ही वाढ चालकांनाही परवडणारी नसल्याने टॅक्सीच्या भाडेदरात किमान पाच रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने केली आहे. वाढ न केल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो ३ रुपये ०६ पैशांनी वाढ केली आहे. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ लागू झाली. या वाढीमुळे सीएनजीचे दर प्रतिकिलो मागे ६१ रुपये ५० पैसे झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरात तीन वेळा वाढ झाली. यामुळे टॅक्सीचालकांना त्याचा फटका बसू लागला आहे. मुंबईत साधारण ३५ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी या सीएनजीवरच धावतात. गेल्या काही वर्षांत न मिळालेली भाडेवाढ यामुळे टॅक्सींचे किमान भाडे मार्च २०२१ पासून २२ रुपयांहून २५ रुपये झाले होते, परंतु सातत्याने होणाऱ्या सीएनजी दरातील वाढीमुळे चालकांचे नुकसान होत असून, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परस्थिती असल्याचे युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. सध्या प्रत्येक चालकाला प्रत्येक दिवशी १०० रुपये नुकसान होऊ लागले आहे. होणारे नुकसान पाहता किमान भाडेदरात पुन्हा वाढ करण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे टॅक्सीच्या किमान भाडेदरात आणखी पाच रुपयांनी वाढ करावी. त्यामुळे भाडेदर २५ रुपयांहून ३० रुपये होईल. ही वाढ त्वरित न केल्यास संपावर जाण्याचा इशारा क्वाड्रोस यांनी दिला आहे. भाडेवाढीसाठी शासनाकडेही सोमवारी पत्रव्यवहारही केला जाणार आहे.

यापूर्वी दोन वेळा वाढ.
१४ ऑक्टोबर २०२१ पासून सीएनजीच्या दरात २ रुपये ३० पैसे इतकी वाढ झाली होती. त्याआधी ४ ऑक्टोबरला प्रतिकिलो ५१ रुपये ९८ पैसे असलेला दर वाढून तो ५४.५७ पैसे झाला होता. त्यामुळे टॅक्सी भाडेदरात किमान तीन रुपये वाढ करण्याची मागणी युनियनने तेव्हा केली होती. आता पुन्हा सीएनजीचे दर वाढल्याने किमान भाडेदरात एकूण पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …