मुंबई – मागील आठवड्यात मंगळवारी वरळी बीडीडी चाळीत सिलिंडर स्फोट होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील ५ वर्षांचा एकटा मुलगा वाचला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलाची जबाबदारी मी स्वत: आणि शिवसेनेने घेतली आहे. यापुढे मी आणि शिवसेना या बाळाचे पालक असू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मागील आठवड्यात मंगळवारी वरळीच्या बीडीडी चाळीत सिलिंडर स्फोट झाला होता. यात पुरे कुटुंबीय जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार न झाल्याने त्याचे पडसाद उमटले आहे. या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले. या प्रकरणी नायर रुग्णालयातील उपअधिष्ठाता यांची तसेच थर्ड पार्टी चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेतील एकटा ५ वर्षीय मुलगा जिवंत असून तो कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. या मुलाचा ४ महिन्यांचा लहान भाऊ, २७ वर्षीय वडील आणि २५ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापौरांनी मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, या मुलाची जबाबदारी आपण स्वत: आणि शिवसेनेने घेतल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
- दोन डॉक्टर व एक नर्सचे निलंबन
या घटनेवरून भाजप सातत्याने शिवसेना आणि महापौरांवर आरोप केले आहेत. त्याबाबत बोलताना ही दुर्घटना झाली, तेव्हा आरोप करणाऱ्यांपैकी कोणी ॲम्ब्युलन्स तरी पाठवली का? असा प्रश्न उपस्थित करून त्यावेळी शिवसैनिक, कार्यकर्ते सुरुवातीला मदतीला धावले, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोद्दारला उपचार होणे शक्य नव्हते. म्हणून नायरला नेले. त्याठिकाणी उपचाराला उशीर झाला असंवेदनशिलता दिसली त्यामुळे २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीने निलंबित केले असल्याची माहिती महापौरांनी दिली. या दुर्घटनेतील मुलाचे वडील नायर हॉस्पिटलमध्येच क्रिटीकल कंडीशनमध्ये होते. आई ५६ टक्के भाजली होती. जे बाळ वाचलंय त्याची प्रकृती स्थिर आहे. सिद्धिविनायकाला, मुंबादेवीला, दर्ग्यात, सर्व धर्मियांच्या देवस्थांनात प्रार्थना करत हे बाळ वाचू दे. शिवसेना या अनाथ बालकाचे आई-बाप होतील. हे बाळ आम्ही दत्तक घेतले आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. गॅस सिलिंडर आता बंद होऊन धोका कमी असलेल्या पाइप गॅसचा अवलंब जास्तीत जास्त होईल, अशा योजना आणाव्यात अशी मागणी महापौरांनी केली आहे.