सातारा – १० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना सुरू आहे. असे असतानाच साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढा एसटी आगारातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
जावळी तालुक्यातील मेढा एसटी आगारात ते सेवेत होते. संतोष वसंत शिंदे (३४, रा. आसगाव ता. सातारा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तुटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. ३ वर्षांपूर्वी ते मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. अशातच लॉकडाऊन लागले व आता संप सुरू झाला. सेवेत दाखल झाल्यापासून तटपुंजा पगार असल्याने या पगारात जगायचे कसे या विचाराने ते हताश झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून ते तणावाखाली होते. मंगळवारी मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.