साईभक्तांना खुशखबर! पास नाहीत, त्यांना मुखदर्शन घेता येणार

शिर्डी – शिर्डीत भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन पासची मर्यादा यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारपासून (१६ डिसेंबर) मुखदर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुखदर्शन गेट सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या दर्शनपास काढून दररोज २५ हजार भाविकांना दर्शन घेता येते. ज्यांना पास मिळू शकले नाहीत, त्यांना मुखदर्शन घेता येणार आहे.
संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबरपासून साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सुरुवातीला दररोज १५ हजार भाविकांना दर्शन पास देण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र भाविकांची गर्दी वाढत गेल्याने आणखी दहा हजार पास वाढविण्यात आले. त्यामुळे सध्या दररोज २५ हजार म्हणजे दर तासाला ११५० भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था आहे, मात्र शिर्डीत आता भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे ही व्यवस्था अपुरी पडत असून, अनेकांना पास मिळू न शकल्याने दर्शन घेता येत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे साईबाबांच्या मुखदर्शनाची व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाविकांमधून होत होती. त्याचा विचार करून संस्थानने १६ डिसेंबरपासून ही व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळची सुट्टी, वर्षअखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात या काळात शिर्डीत भाविकांची जास्त गर्दी होते. या काळात जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …