सांगली – सांगलीतील कुख्यात गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटीलसह आणखी चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहरातल्या संजयनगर, विश्रामबाग आणि कुपवाड परिसरातील सराईत गुन्हेगार करण रामा पाटील व त्याच्या टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत हल्ला, चोरी, लूटमार, दरोडा यांसारखे २३ गंभीर गुन्हे केले आहेत.
पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील हा अवघ्या २२ वर्षांचा असून, विकास गोसावी, आकाश जाधव, अमोल साठे हे त्याचे साथीदार होते. त्यामुळे पाटीलसह या सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिद्दकर यांनी प्रस्ताव तयार करून कोल्हापूर परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. अधिक तपास डीवायएसपी अजित टिके करत आहेत.