ठळक बातम्या

सहज भूमिका साकारणारे मामा पेंडसे

तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके

9152448055\\

मामा पेंडसे हे नाव आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल. माहिती असेल, तर तो खरा नाटककार, रंगकर्मी किंवा अभ्यासू कलाकार म्हणावे लागेल. कारण रंगभूमीवर योगदान देण्यासाठी येणाºयांना त्याचा इतिहास आणि त्या रंगभूमीवर ज्यांनी ज्यांनी उज्ज्वल कामगिरी केली आहे, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्या कलाकाराला आपले ध्येय गाठता येते, म्हणूनच मामा पेंडसे या कलाकाराची माहिती प्रत्येक रंगकर्मीला असली पाहिजे.
सांगलीला नाटकाची पंढरी म्हणतात. दरवर्षी रंगभूमी दिनाला तेथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मोठा कार्यक्रम होतो आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. याच नाट्य पंढरी सांगलीतील एक कलाकार म्हणजे चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे. त्यांना मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते म्हणून ओळख आहे. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले, तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणाºया शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता.

पूर्वीच्या काळी बॉक्स सेटवर नाटके होत नव्हती, तर पडदे असत. हे पडदे इतके जीवंत असत की, थ्री डायमेन्शनमध्ये त्याचे रंगकाम असे, त्यामुळे त्या घराचा, जंगलाचा किंवा जेथील ते दृष्य आहे त्याचा भास त्या पडद्यावरून व्हायचा. एकच प्यालामध्ये तळीरामचे जुने घर दाखवण्यासाठी वापरलेला पडदा असाच अफलातून होता. प्रेक्षकांतून बसून पाहिल्यावर तो पडदा आहे असे कोणाला वाटायचेच नाही. ती खिडकी, त्यातून आत आलेला सूर्यप्रकाश यासाठी केलेली कलाकुसर आणि रंगकाम खरेच घर वाटावे इतके सुंदर. त्यामुळे पडदे तयार करणारे हे महत्त्वाचे कलाकार होते.
म्हणूनच मामांना या विषयात गोडी होती. याशिवाय आणखी एक कारण होते ते हे की, नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत होती. मराठी नाटकाच्या जन्मापासून नट मंडळी मिळाली ती आचारी, ताक घुसळणारा, पाणक्या यांसारखी. त्यांच्याबरोबर त्यांची व्यसनेही नाटक मंडळीत शिरली. स्वत:ला साळसूद म्हणवणाºया प्रतिष्ठित लोकांनी ही नटांची व्यसने पोसली व त्यांचा गवगवाही केला. जो नाटकात स्त्रीपात्र पाहील त्याला सात जन्म स्त्रीत्व प्राप्त होईल, असाही एक लोकापवाद होता. त्या स्त्रीपात्राला काय शिक्षा होती देव जाणे! अशा या प्रतिष्ठा नसलेल्या व्यवसायात सामील व्हायला वडिलांनी नाकारले नसते, तरच नवल. म्हणून मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली.

मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणाºया बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच, १९३६ साली मामा पेंडसे यांनी रमेश नाटक मंडळीत प्रवेश मिळवला. त्यांच्या आग्‍य्राहून सुटका या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे समर्थ नाटक मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, ललित कलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यांत मामांना कामे मिळू लागली.
मामा पेंडसे तसे या क्षेत्रात अपघातानेच आले असे म्हणावे लागेल. त्याचे झाले असे की, एकदा रात्री नऊ वाजता महाडचे यशवंत महादेव ऊर्फ अप्पा टिपणीस यांनी लिहिलेल्या राजरंजनचा प्रयोग होता. दुपारी दोन वाजता बातमी आली की, सय्यद अल्लीची भूमिका करणारे नारायणराव फाटक यांचे एकाएकी आॅपरेशन ठरल्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. सर्वांची बोबडी वळली. आयत्या वेळी कुणाला उभे करायचे हा प्रश्न पडला.

अरे तो पेंटरचा गडी पेंडसे फावल्या वेळात नाटकातले उतारे म्हणत असतो; त्याला पाहू या आज उभा करून अशी सूचना आली. मामा तयार झाले सय्यद अल्लीचा पोशाख चढवला, दाढी, मिशी चिकटवली, फेटा बांधला आणि स्टेजवर जाऊन राजाला मुजरा ठोकला. खास नेमलेल्या प्रॉम्प्टरने सांगितलेली वाक्ये मामांनी कशीबशी उरकली आणि एकदाचा विंगेत सहीसलामत सटकले. पडदा पडल्यावर कंपनीचे मालक नानासाहेब चापेकरांनी शाबासकी दिली आणि म्हणाले, छान! आता तुला नाटकांत कामे द्यायला हवी आणि अशा रीतीने मामा पेंडसे नट झाले. मामा पेंडसेंनी म्हटले आहे, हत्तीवर बसणे किंवा चांदीच्या ताटात जेवणे हे जसे माझे विषय नव्हेत, तसेच नट होणे हा माझा विषय नव्हे, अशी माझी तोपर्यंत धारणा होती. मुंडी कापलेल्या कोंबड्याने निष्फळ फडफड धडपड करावी तशी जगण्यासाठी ध्येय धोरण नसलेली माझी आतापर्यंत धडपड चालली होती. सय्यद अल्लीच्या भूमिकेने मला हरवलेले मिळवून दिले. मी नट झालो. पडदा रंगवायचे सोडून स्वत:चा चेहरा रंगवायला सुरुवात केली.
केशवराव दाते हे मामा पेंडसे यांचे अभिनयातले गुरू. नाटकाबद्दल चर्चा करायची असते, हे केशवराव दाते यांच्याकडून मामा शिकले. त्यापूर्वी लेखकाने लिहिलेली वाक्ये पाठ करायची, दिग्दर्शकाने दाखवलेल्या हालचाली लक्षात ठेवायच्या आणि प्रेक्षकांकडून दोन-चार वेळा हशा-टाळ्या घेतल्या की, भूमिका चांगली झाली असा त्यांचा समज होता. हा समज पुढे गैरसमज ठरला आणि मामा एक अभिनय संपन्न नट बनले.

अहमदनगरला किर्लोस्कर संगीत मंडळींचे नाटक होते. मामा नाटकाच्या विंगा-झालरी वगैरे लावायचे काम करीत. त्यामुळे तेही अहमदनगरमध्ये होते. तेथे त्यांच्या बरोबरच्या आगाशे नावाच्या कंपनीतील मुलाबरोबर फावल्या वेळात कुस्ती खेळताना मामांच्या पायाचे हाड मोडले. नगरच्या हॉस्पिटलात उपचार घेतल्यावरही पायाचे हाड व्यवस्थित न बसल्यामुळे त्यांना काठीच्या आधाराने चालावे लागे. कंपनीला आता त्यांची गरज उरली नव्हती. दहा महिन्यांचा पगार न देता फक्त सांगलीपर्यंतच्या तिकिटाचे पैसे देऊन मामांची बोळवण झाली. खेटरे खाल्ल्यासारखा चेहरा, शेंडी जाऊन डोक्यावर केसांचे छप्पर व काठीच्या आधाराने पडणारे त्यांचे वाकडे पाऊल पाहून घरच्या मंडळींना मामांचे पाऊल खरेच वाकडे पडले असेच वाटले असणार. नंतर त्यांचा पाय बरा झाला तरी उजवा पाय डाव्या पायापेक्षा दीड इंचाने तोकडा राहिला; चाल दिडकी झाली, पण हातातली काठी सुटली, पण नशिबातले हॉस्पिटल सुटले नाही. बारा वर्षांत मामांच्या पोटावर पाच वेळा मोठमोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. प्रत्यक्ष यमाला देखील मामा बनवून आपली दिडकी चाल सहज लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने मामा पेंडसे स्वैरपणे रंगमंचावर वावरले आणि यशस्वी अभिनेते म्हणून प्रसिद्धीच्या झोतात राहिले.
त्या काळात गाजलेल्या जुन्या नाटकांमध्ये मामा पेंडसे यांची भूमिका असलेली नाटके म्हणजे लक्षात राहिलेल्या भूमिका होत्या. यामध्ये आग्य्राहून सुटका (उमरखान+जयसिंग), आंधळ्यांची शाळा (विश्वनाथ), आशीर्वाद (तात्या), एक होता म्हातारा (नाना-बाबा), कथा कुणाची व्यथा कुणाला (सोमण), कन्या सासुरासी जाये (दादासाहेब), करीन ती पूर्व (शिवाजी), कुलवधू (बाप्पा), कोणे एकेकाळी (हणमंतराव), खडाष्टक (कर्कशराव+वारोपंत+राघोपंत), चंद्रग्रहण (जगदेवराव), चंद्र नभीचा ढळला (अमात्य), झुंज (बाबासाहेब), तुझे आहे तुजपाशी (आचार्य), तोतयाचे बंड (नाना फडणीस), दुरिताचे तिमिर जावो (पंत), देव नाही देव्हाºयात (दादासाहेब), पंडितराज जगन्‍नाथ (शहाजहान), पुण्यप्रभाव (भूपाल), बेबंदशाही (कब्जी+खंडोजी+संभाजी), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (घनश्याम), भूमिकन्या सीता (सुमंत), विद्याहरण (युवराज+शुक्राचार्य), संन्यस्त खड्ग (विक्रमसिह) या भूमिका त्यांनी साकारल्या.

त्यांचा आवाज, संवादफेक आणि करडी नजर यामुळे जुन्या पिढीतील प्रेक्षकांना मामांचा अभिनय खूप आवडायचा. त्यांचा अभिनय हा वास्तवाशी जवळ जाणारा होता. किंबहुना आपण समाजात असे व्यक्तिमत्व कुठेतरी पाहिले आहे, आपल्या आसपासच आहे अशा प्रकारे त्याचे सादरीकरण असायचे. तुझे आहे तुजपाशी या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकातील त्यांचा आचार्य हा असाच आसपासचा वाटायचा. ही सहजता त्यांना साध्य झाली होती म्हणून ते एक लक्षात राहणारे रंगकर्मी ठरले.
तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *