सरकारमध्ये लोकशाही नव्हे, तर रोकशाही

 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी डागली तोफ!


मुंबई – बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून, त्याचीच प्रचिती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले. लोकशाहीला कुलुपबंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. या सरकारमध्ये लोकशाही नसून रोकशाही असल्याचे मत यावेळी फडणवीस यांनी मांडले.
बुधवारपासून विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशने घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
संसदेचे, अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकते, पण महाराष्ट्रात अधिवेशन घेण्याची मानसिकताच या सरकारची नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि भोगशाही चालू आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार राज्याच्या जनतेने कधीही पाहिला नाही. स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार सरकारच्या काळात पाहायला मिळतायेत, तेवढे कधीच पाहायला मिळाले नाहीत, अशा शब्दांत फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंडे बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणे राज्याच्या इतिहासात अक्षरश: काळिमा फासण्याचे काम सरकारच्या दबावाखाली होत आहे. ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची कारणे सांगून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्याचे एवढेच कारण आहे की, आपल्या स्वत:च्या आमदारांवर सरकारला विश्वास नाही, सरकार कधीही अडचणीत येऊ शकते, असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. म्हणून मुद्दाम आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने केला आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पोकळ असल्याचे फडणवीस म्हणाले. पेपरमध्ये वाचायला मिळाले की, या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार आहे. १२ आमदार बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची, म्हणजे सरकार किती असुरक्षित आहे. राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झालेली असताना नियमबाह्य पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा घाट घातला जातोय. १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे हे सांगत होते. ते किती पोकळ आहे, हे यातून लक्षात आले, असे त्यांनी म्हटले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …