प्रवाशांना वेठीला धरून काही राजकीय नेत्यांच्या भडकावण्याने एसटी कर्मचाºयांचा संप चालू आहे. हा संप करताना या कर्मचाºयांना स्वत:चे हीत समजत नाहीये आणि सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम चालवले आहे. पण सरकारने आता कसल्याही प्रकारे तडजोड करून मागे हटता कामा नये. आज एसटी कशामुळे तोट्यात गेली आहे, त्याची पूर्ण चौकशी करूनच त्यांच्या मागण्यांचा विचार झाला पाहिजे.
एकेकाळी एसटी हे महाराष्ट्राचे वैभव होते; पण काही अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करून एसटीचे शोषण केले. महामंडळाकडे जाणारा पैसा, उत्पन्न यांनी कमावले. एसटीच्या तोट्याचे मूळ कारण हे आहे. शेजारी राज्य असलेले कर्नाटक, गोवा यांच्या बसेस नफ्यात चालतात, गच्च भरून जातात आणि महाराष्ट्रातल्या बसेस रिकाम्या का जातात, याचा कधी विचार केला आहे का? त्याची अगोदर चौकशी झाली पाहिजे. एसटी बसस्थानकात फक्त एसटीच्याच बसेस लागतील याची व्यवस्था केली पाहिजे. बसस्थानकात येणाºया खासगी बसेसना मनाई करण्याची यंत्रणा केली पाहिजे. या खासगी बसेसना आपले थांबे देऊन खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यातील टक्केवारीचा हिशेब केला पाहिजे. तोटा या गैरप्रकारांनी होत आहे.
एसटीचा तोटा नेमका कशामुळे होतो, हे आता स्पष्टच सांगायची वेळ आलेली आहे. हा संचित तोटा असला, तरी जेव्हापासून एसटीने आॅनलाइन रिझर्व्हेशन, आॅनलाइन तिकिटे देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून एसटीचे कर्मचारी हे हवालदिल झाले. तिकिटांचा काळाबाजार करता येणे वाहकांना शक्य होईना, असे झाले. एसटीचे कंडक्टर कित्येक वेळा गाडीतून उतरताना तिकीट मागून घेतात. उतरताना तिकीट परत घ्यायचे आणि तेच तिकीट नव्या प्रवाशांना द्यायचे. ज्या ठिकाणी एसटीची शहर बस वाहतूक होती त्या ठिकाणी तर हे प्रकार हमखास चालतात. तिकिटासाठी दिलेल्या पैशांतून उरलेले पैसे देण्याची टाळाटाळ करणे या प्रकारात तर एसटीचे कंडक्टर बदनाम झालेले दिसतात. ही जी चटक लागलेली आहे, ती भरून काढण्यासाठी एसटीचे थांबे मोडीत काढून हॉटेलवर गाडी उभी करण्याचे तंत्र अवलंबले गेले. महामार्गावरील हॉटेल, ढाबे हे चालक-वाहकांनी अड्डे बनवले. त्यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने काही हॉटेल ही अधिकृत केली. त्यासाठी स्वस्त दरात चहा, पाणी, नाष्टा मिळेल अशी जाहिरात केली; पण प्रत्यक्षात त्या दरात नाष्टा देण्याची सोयही मोडून काढली, ती याच कर्मचाºयांनी. एसटीतील पाच पंचवीस प्रवासी हॉटेलवर घेऊन गेले की, यांच्या चहापाण्याची सोय होते.
सध्या याच एसटी वाहक-चालकांनी चालवलेला प्रकार म्हणजे गाड्या वेळेवर न्यायच्या नाहीत. एसटीच्या अधिकृत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना घ्यायचे नाही, गाडी भलतीकडेच उभी करायची. एसटीच्या अधिकृत थांब्यांवर असतात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस हा प्रकार भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. नेरूळ एलपीच्या बसस्टॉपवर एसटी थांबत नाही. तिथे खासगी गाड्या थांबवल्या जातात आणि एसटीच्या बस बाहेरच्या बाहेर रिकाम्या नेल्या जातात. एखाद्याने रिझर्व्हेशन केले असेल, तर त्याला ही बस सापडत नाही, कारण गाडी भलतीकडेच उभी केलेली असते. एसटीचे मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारात असलेले फोन कायम बंद असतात. प्रवाशांनी कसलीही चौकशी केली, तर उत्तरे मिळत नाहीत. असाच प्रकार राज्यात सगळीकडे आहे. आपली बस भरून वहावी आणि चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत. पुण्याहून मुंबईकडे येताना चांदणी चौकात असंख्य प्रवासी असतात. खासगी वाहने त्यांना घेतात. एसटीच्या गाड्या रिकाम्या जातात; पण प्रवाशांना घेत नाहीत. अशी असंख्य उदारहणे आहेत. महामंडळाचे सरकारीकरण केल्यावर यांचा पगार सुरक्षित होईल, प्रवाशांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा प्रत्येक ड्रायव्हर-कंडक्टरच्या ताब्यात दिलेल्या बसने किमान इतके उत्पन्न, इतके प्रवासी आणलेच पाहिजेत, अशी सक्ती करावी लागेल. कायम तोटा कसा काय चालतो?
पुण्यात स्वारगेट बसस्थानकात बाहेरच्या ट्रॅव्हल्स कंपनीचे एजंट मुंबई, कोल्हापूरचे प्रवासी पळवत असतात. समोर कंट्रोलरूम असतानाही बसपाशी येऊन हे एजंट बसस्थानकातून नटराज हॉटेलपर्यंत प्रवाशांना घेऊन जातात. बसस्थानकाला या एजंटचा विळखा असतो. प्रवासी पळवत असताना तिथे असलेले एसटी कर्मचारी या लोकांना विरोध करत नाहीत. याचे कारण या कर्मचाºयांना ते एजंट दरमहा काही देत असावेत. संप केल्यावर पगार मिळणार नाही हे माहिती असूनही या मार्गाने पैसा मिळत असतो, म्हणून संप चालू ठेवला जातो.
याशिवाय एसटीला पार्सलचे उत्पन्न होते, बसस्थानकांवर असलेल्या गाळे, हॉटेल, दुकाने यांचे उत्पन्न असते. त्यात होत असलेला काळा कारभार पहिल्यांदा तपासला आणि प्रत्येक कर्मचाºयाच्या कामाचे आॅडीट केले, तरच नेमका तोटा कुठे होत आहे, हे समजेल. सातारा ते मुंबई प्रवासात कित्येकवेळा तिकिटाचे पैसे मुंबईपर्यंतचे घेतले जातात आणि तिकीट कळंबोलीचे दिले जाते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे संपूर्ण कारभाराचीच चौकशी केली पाहिजे. प्रत्येक बसचा ड्रायव्हर हा तंबाखू, पान खाताना गाडीत आपल्या पायापाशीच थुंकत असतो. आपली गाडी ही आपली लक्ष्मी आहे, आपल्याला उत्पन्न देणारी गाडी आहे, हे लक्षात न घेता ती अस्वच्छ केली जाते. अशा कर्मचाºयांना एसटीच्या तोट्याचे काय पडले आहे?, तेव्हा सरकारने न डगमगता काम करावे आणि या आंदोलनापुढे झुकू नये. आता त्यांच्या संपाबाबत सहानुभूती संपलेली आहे. न्यायालयाने सांगूनही संप मिटत नाही. सरकारने मागण्या मान्य करूनही संप मिटत नाही. कर्मचाºयांचे निलंबन करूनही संप मिटत नसेल, तर सरकारनेही मागे हटू नये.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\