ठळक बातम्या

समृद्धी महामार्ग २०२२ मध्ये पूर्ण होणार

५५ हजार कोटी खर्च
७५ टक्के काम पूर्ण

१० जिल्ह्यांना जोडणारा मार्ग
१८९ पैकी १६३ भुयारी मार्ग पूर्ण

मुंबई – आतापर्यंत समृद्धी महामार्गाच्या मुंबई ते नागपूर या टप्प्याचे एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतुकीस खुला होणे अपेक्षित होते, मात्र आता हा टप्पा नव्या वर्षात सेवेत येईल, तर संपूर्ण प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केले आहे. मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासांत पार करण्यासाठी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते, मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. आता एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आहे. या प्रकल्पासाठी ८८६१.०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, यापोटी मोबदला म्हणून ७४२४.३७ कोटी रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रकल्पातील सर्व टप्प्यांतील सविस्तर आराखड्याला पर्यावरणविषयक आणि वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. टप्पा २ आणि ५ मधील आराखड्यास वन्यजीव संरक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सध्या सर्व टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत.

या प्रकल्पात वन्य जीव संरक्षणावरही भर देण्यात आला आहे. त्यानुसार वन्य जीवांसाठी तीन भुयारी तर ३ उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. यापैकी तीनही भुयारी मार्ग पूर्ण झाले असून, एका उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, तर दोन उन्नत मार्गांचे काम सुरू आहे. वाहनांसाठी बांधण्यात येत असलेल्या ६५ उन्नत मार्गांपैकी १३ मार्ग पूर्ण झाले असून, ५२ मार्गांचे काम सुरू आहे, तर वाहनांसाठीच्या १८९ भुयारी मार्गांपैकी १६३ मार्ग पूर्ण झाले असून, २६ मार्गांचे काम सुरू आहे. यासह अन्य कामेही प्रगतीपथावर आहेत.
५५ हजार ३३५.३२ कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात येणाºया या प्रकल्पाच्या सद्यस्थितीच्या अनुषंगाने विचार करावयाचा झाल्यास एकूण १,६९९ प्रकारची बांधकामे या प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहेत. ७०१ किमींच्या मार्गात तब्बल ६५ उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, आतापर्यंत यातील २४ उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर ४१ उड्डाणपुलांचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पात ३२ मोठ्या, तर २७४ छोट्या पुलांचाही समावेश आहे. १९ छोटे, तर २२६ मोठे पूल पूर्ण झाले असून, १३ छोट्या आणि ४८ मोठ्या पुलांचे काम वेगात सुरू आहे. आठ रेल ओव्हर पुलांच्या कामांपैकी चार पुलांचे काम झाले असून, ४ पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पात एकूण सहा बोगदे समाविष्ट असून, या सहाही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे.

१० जिल्ह्यांना, २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना जोडणाºया या महामार्गाचा वापर अधिकाधिक व्हावा, यासाठी प्रकल्पात एकूण २४ इंटरचेंजेस अर्थात प्रवेशद्वारे देण्यात आली आहेत. या २४ पैकी १६ प्रवेशद्वारांची कामे सुरू असून, आठ प्रवेशद्वारांची कामे पूर्ण झाली आहेत. समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. कामाचा वेग सध्या वाढविण्यात आला आहे, पण पहिला टप्पा वा संपूर्ण मार्ग कधी सेवेत येईल, यावर आता भाष्य करता येणार नाही.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …