ठळक बातम्या

‘समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हा – अमित ठाकरेंचे जनतेला आवाहन

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकांसाठी पक्षाची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न करत असल्याचा तर्क काढला जात आहे, मात्र एकीकडे राज ठाकरे पक्षीय बांधणीवर भर देत असताना त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एका वेगळ्याच गोष्टीसाठी साद घातली आहे. राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागाला चकचकीत करण्यासाठी अमितने एक मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारपट्टी भाग स्वच्छ करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शनिवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागांत ‘समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवली येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे. अमित ठाकरेंचा एक व्हिडीओ मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात असून त्यामध्ये अमित ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखण्यात आपण कमी पडतो आहे. आपल्या सर्वांनाच कुठे ना कुठे तरी वाटत असेल, परदेशातील समुद्रकिनारे स्वच्छ, सुंदर का असतात? पण आपल्या राज्यात ते का नाहीत? आपल्याकडील समुद्रकिनारे अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपण जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. जगभरातील विविध देशांत समुद्र आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सर्वसामान्य लोकही याबाबत जागरूक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्षे स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसेंबरपासून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत, अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीने हे समुद्रकिनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …