ठळक बातम्या

समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीकडून समन्स

  • १४ डिसेंबरला उपस्थित राहावे लागणार

मुंबई – मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता याप्रकरणी समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीसमोर हजर व्हावे लागणार आहे. १४ डिसेंबर रोजी हजर राहण्याचा समन्स समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून बुधवारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र विरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशोक कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली होती, तसेच त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रारदाराला पुरावे घेऊन माटुंगा रोड कार्यालयात बोलावले होते. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते यांनी कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केले असून, पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी समीर वानखेडे यांना देखील बोलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून, त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तर नवाब मलिक यांचे सर्व दावे समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …