फडणवीस आक्रमक
भास्कर जाधव यांची बिनशर्त माफी
मुंबई – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे बुधवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. बोलण्याच्या वेळी नकळत माझ्याकडून हातवारे होतात. मी नक्कल केली, मात्र मी असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. अध्यक्ष महोदय तुमच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. यानंतरही देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात हक्कभंग आणणार असतील, तर मी त्यासाठी तयार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नावर उत्तर देत असताना, या सगळ्या वादाची सुरुवात झाली. यावेळी कोरोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाहीत, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांची नक्कल करत काही वाक्य बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीस यांनी म्हटले.
त्यानंतरही भास्कर जाधव काही केल्या ऐकायला तयार नव्हते. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे, तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा अर्थ होऊ शकतो, असे म्हणत जाधव यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे म्हटले. मात्र, अंगविक्षेप मागे घेण्याचे कोणतेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेने घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. पंतप्रधानांचा असा अवमान होणार असेल, तर हक्कभंग आणला जाईल. त्यांनी अंगविक्षेप केल्याचे मान्य केले आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरूच राहिल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले होते. अखेर जाधव यांना माफी मागणे भाग पडले.