ठळक बातम्या

सध्या कोरोना व्हॅक्सिनेशनवर राज्य सरकारचा भर – राजेश टोपे : घरोघरी जाऊन लस देण्याचे नियोजन

घरोघरी जाऊन लस देण्याचे नियोजन
मुंबई – वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता दिल्लीत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तशी गरज पडल्यास मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स एकत्रितपणे निर्णय घेतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सध्या सर्वांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे आणि लस घ्यावी. लसीकरणासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याकरिता सर्वच पक्षांच्या स्थानिक, धार्मिक नेते आणि एनजीओंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी बुधवारी केले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे संपूर्ण लक्ष सध्या लसीकरणावरच असल्याचे सांगितले आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरीही यात दोन गोष्टी सकारात्मक आहेत. त्या म्हणजे, कोरोनाची लागण झालेले ओमिक्रॉन संक्रमित बरे होत आहेत. दुसरा म्हणजे, ओमिक्रॉनमुळे मृत्यूची नोंद नगण्य आहे, तसेच सरकारचा लसीकरणावर जास्तीत जास्त भर आहे. सर्वच राजकीय पक्षांनी, एनजीओ आणि धार्मिक नेत्यांनी यासाठी एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा. लसीकरणावर लोकांच्या मनात काही नकारात्मकता असेल, तर त्या दूर कराव्या, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.
लसीकरणाच्या बाबतीत लोक संकोच करत आहेत. अशात पहिला डोस न घेतलेल्या लोकांना त्यांच्या घरात जाऊन लस देण्यावर काम सुरू आहे. यासोबतच ज्यांनी पहिली लस घेतली, पण दुसरी घेतलेली नाही. अशा लोकांना आम्ही एसएमएस आणि फोन करून लस घेण्याचे आवाहन करत आहोत, तरीही स्थानिक पातळीवर असलेल्या नेत्यांनी लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करावी. महाराष्ट्रात दुसरे डोस घेणाºयांची संख्या ५७ टक्क्यांवर गेली आहे. देशाच्या तुलनेत ही सरासरी मागे असल्याने आपल्याला लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावे लागेल, असे टोपे म्हणाले.
केंद्र सरकारने १५ वर्षांपुढील मुला-मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच आपण या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार आहोत. लसीकरण केंद्रावर मुले येत नसतील, तर त्यांना शाळेत जाऊन लस देता येईल का, यावर सुद्धा राज्य सरकारचे काम सुरू आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
बुस्टर डोस आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणावर केंद्राकडून प्लॅनिंग सुरू आहे. यासंदर्भात माहिती देण्यात आली, तरीही त्याचा सविस्तर कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. बुस्टर डोस देताना कोरोनाची लस कोव्हॅक्सीन घेतलेल्यांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस द्यावा की, कोव्हिशील्डचा हे अद्याप स्पष्ट नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणावर सुद्धा अद्याप सरकारकडून कार्यक्रम आणि प्लॅनिंग देण्यात आलेले नाही. त्यामुळे, केंद्र सरकारकडून प्लॅनिंग येताच त्यावर सुद्धा काम सुरू केले जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …