सत्तेत नव्हे, सेवेत राहायचे आहे * मोदींची देशवासीयांशी ‘मन की बात’

नवी दिल्ली – मला सत्तेत नाही, तर सेवेत राहायचे आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनातील भावना देशवासीयांशी बोलून दाखवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ नोव्हेंबर) ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘मन की बात’मधून विविध मुद्यांवर भाष्य केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वृदांवन धामची भव्यता, पर्यावरण आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ मिळालेल्या राजेश कुमार प्रजापती नावाच्या व्यक्तीशी मोदींनी संवाद साधला. त्याचे आजारपण, त्याला मिळालेली मदत आदी मुद्यांवर मोदींनी प्रजापतीशी संवाद साधला, तसेच इतरांनाही या योजनेची माहिती देण्याचे आवाहन मोदींनी त्याला केले. त्यावेळी प्रजापतीने मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली. तुम्ही सत्तेत राहोत, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. त्यावेळी मी आता सत्तेत असल्याचे मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ऑस्ट्रेलियात पर्थ नावाचे शहर आहे. या शहराबद्दल आपल्या क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना अधिक माहिती असेल. कारण या ठिकाणी नेहमी क्रिकेटचे सामने होतात. पर्थमध्ये सॅक्रेड इंडियन गॅलरी आहे. ती ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगतारिणी यांच्या मालकीची आहे. त्या जगतारिणी यांनी वृंदावन येथे येऊन १३ वर्षे वास्तव्य केले. वृदांवनशी त्यांचे नाते जुळले होते. जगतारिणी यांनी ऑस्ट्रेलियात वृदांवन निर्माण केले, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हिमाचल प्रदेशमधील कार्यक्रम, राणी दुर्गावतीचे योगदान यांचे स्मरण ‘मन की बात’च्या माध्यमातून केले. ‘मन की बात’च्या माध्यमातून देशभक्तीपर गीत लेखन, रांगोळी लेखन यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. भारतातील सर्व कानाकोपऱ्यात या योजनेला आपण पुढे घेऊन जाऊ, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …