सतीश सावंतांनी हल्ला घडविल्याचा निलेश राणेंचा आरोप

 

  • शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी चौघे ताब्यात

सिंधुदुर्ग – कणकवलीत घडलेली मारहाणीची घटना ही सतीश सावंत यांच्या विकृत मनोवृत्तीचे कारस्थान आहे, असा सनसनाटी पलटवार माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केला. सतीश सावंत यांचा पीए, ड्रॉयव्हर आणि जिल्हा बँकेचे लँड लाइन डिटेल्स पोलिसांनी जाहीर करावेत, मग सत्य बाहेर येईल, असे राणे म्हणाले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
सतीश सावंत हा अत्यंत कारस्थानी माणूस आहे. कारस्थाने घडवून आणायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा त्यांचा धंदा आम्हाला माहिती आहे. कणकवलीची घटना हे त्यांचेच कारस्थान आहे. हे कारस्थान कसे घडले, कुठे घडले, कोणी घडवले याची माहिती घेण्यासाठी सतीश सावंत, त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा बँकेची लँडलाइन यांचे तपशील पोलिसांनी तपासावेत, असे निलेश राणे यांनी सांगितले. निवडणूक तोंडावर आली, म्हणून हे असले प्रकार घडवले जात आहेत. ते घडवणारा माणूस सतीश सावंतच आहे. असले काही तरी उद्योग करायचे आणि खापर राणेंच्या नावावर फोडायचे, असा हा डाव आहे. गेल्या सात वर्षांत शिवसेनेची सत्ता आहे. दीपक केसरकर गृहराज्यमंत्री होते. आज ठाकरे सरकार सत्तेत आहे, तेव्हा राणेंच्या विरोधात एकसुद्धा केस का सापडली नाही?, सात वर्षांत एकही वादग्रस्त घटना का घडली नाही?, असे सवाल निलेश राणे यांनी केले. घडलेल्या घटनेसंदर्भात आम्ही योग्य तो कायदेशीर पाठपुरावा करू. आमचे वकील न्यायालयात या प्रकरणाची चिरफाड करतीलच, पोलिसांनीही आपले काम जबाबदारीने करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

दुसरीकडे, कणकवलीतील शिवसैनिक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर शनिवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत फोंडाघाट चेक पोस्टवर पकडलेली कार व त्यातील चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या चौघाही तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, नेमका त्यांनी हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला?, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच या प्रकरणामागे राजकीय कारण आहे की अन्य काही?, याबाबतही पोलीस तपास सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …