रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये खेळणार
मुंबई – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा दुसरा सीझन सुरू होत असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर माजी खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ही लीग भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युपीए)मध्ये खेळवली जाईल. भारतात ही टी-२० लीग ५ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होत आहे, तर १ मार्चपासून ती युपीएमध्ये खेळवली जाईल. या मोसमाचा अंतिम सामना १९ मार्च रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये भाग घेतात. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत.
गेल्या वर्षी लीगचा पहिला सीझन खेळवण्यात आला होता. ज्यात भारतीय संघ विजयी झाला होता. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण भारताकडून खेळले. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिजचे संघही यात खेळले. या संघांमध्ये जॉन्टी ऱ्होड्स, कार्ल हूपर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान हे खेळाडूही खेळले. यावेळीही हे खेळाडू या स्पर्धेत पुन्हा दिसतील, अशी अपेक्षा आहे.
लीगच्या चालू हंगामात इंडिया लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, न्यूझीलंड लीजेंड्स, पाकिस्तान लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स हे संघ सहभागी होतील. पहिला सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ १२ मार्चला यूएईमध्ये आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेत एकूण ३८ सामने खेळवले जातील. लीग टप्पा १५ मार्चपर्यंत चालेल आणि त्यात एकूण ३५ सामने खेळवले जातील आणि त्यानंतर दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. १६ आणि १७ मार्च रोजी हे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. फायनल १९ मार्चला होणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठीचे संघ अद्याप जाहीर झालेले नाहीत.
लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेच्या आयोजना मागचा उद्देश आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात १६० हून अधिक निवृत्त क्रिकेटपटू दिसणार आहेत. ही मालिका एमएसपीएल आणि एएनझेडए इन्व्हेस्टमेंट ग्रुपतर्फे भव्य पद्धतीने आयोजित केली जाईल. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. आयोजकांनी एएनझेडए इन्व्हेस्टमेंट ग्रुपला मेगा इव्हेंटसाठी एनओसी देखील जारी केली आहे. एएनझेडए इन्व्हेस्टमेंट ग्रुप ही शेख हमदान बिन मोहम्मद अलनायान यांची समूह कंपनी आहे.