सचिन वाझेला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात आता १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सचिन वाझेची पोलीस कोठडी संपली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाझेला देण्यात आली आहे.
गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याच्या कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. शनिवारी पुन्हा १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझं पार्टनरशीपमध्ये गोरेगाव येथे बोहो रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये बीसीबी स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी ९ लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी, फेब्रुवारी २०२०पासून ते मार्च २०२१ या काळात ९ लाखांची वसुली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितानुसार ३८४, ३८५ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली होती. ही गाडी सचिन वाझेने ठेवल्याचा आरोप आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही वाझेवर आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी एनआयएकडून वाझेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा पोलिसांना देण्यात आला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …