संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांना भाजपकडून तीन महिन्यांचे रेशन

  • चंद्रकांत पाटलांची घोषणा

सांगली – गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. यात प्रवाशांचे हाल होत असले, तरी राज्य सरकार तोडगा काढण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांना या संपामुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व घडामोडी पाहता भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला असून, त्यांना तीन महिन्यांचे रेशन देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारशी चर्चा करून संपावर तोडगा काढावा अशी मागणीदेखील यावेळी पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील मंगळवारी सांगली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या व्यथा पाटलांसमोर मांडल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र असे न करता सरकारने देखील कामगारांच्या व्यथा समजावून घेतल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांची समजूत घालून संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी बसने दुपटीने भाडेवाढ केली आहे. हे आता थांबायला हवे. जर खासगी बसच्या चालकाला ५० हजार रुपये पगार असेल, तर तेवढाच पगार हा महामंडळाच्या बस चालकाला का दिला जात नाही, असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने, या संपावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …