संजय राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

नवी दिल्ली – विरोधी पक्ष भाजपला ‘सळो की पळो’ करून सोडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपविरोधात केलेल्या वक्तव्याने त्यांच्याविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबरला राऊतांविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून आता १२ डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाजप कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरले होते. त्यात महिलांबाबतही चुकीचे शब्द होते. त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

——————————————————-
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न – संजय राऊत

मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मूर्ख आणि बुद्धू असा आहे, असे राऊत म्हणाले. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचे नेतृत्व करते. हा गुन्हा बदल्याच्या आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत म्हणाले. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र, या मार्गाने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम शरद पवार करू शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा, परंतु मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार, असे संजय राऊत यांनी ठासून सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …