मुंबई – देवेंद्र फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने आम्ही विधाने केली. पण तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना वेगळी केली असेल पण त्या कागदालाही वाळवी लागलीय असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.
संजय राऊत म्हणाले की, कोकणची जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे. स्थानिक भूमिपूत्रांना विषारी जहरी प्रकल्प नको असेल आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेना छातीवर घेईल. बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. उद्योग राहिला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. उद्योग जगला तर कामगार जगेल ही आमची भूमिका कायम आहे. मग एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे. कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत. बारसू प्रकल्पाजवळ अनेक धनिकांनी जमीन घेतले असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीस खोटे बोलतात
२०२४ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती, इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. बोलतात एक पण त्यांच्या अंतरंगात जी वेदना आहे ती जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचे अंतरंग धगधगतंय असं राऊतांनी सांगितले.
अमित शाह देशाचे गृहमंत्री कमी, भाजपा नेते जास्त वाटतात
अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी खरेतर काश्मीरात जास्त जायला हवं. जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तिथे जायला हवं. परंतु त्यांना महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसतंय. सरकार अस्थिर आहे. सोंगटे आणि गोटे हलवायचे असतील तर त्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतील. अमित शाह हे गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात. या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्रालाही निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. पाठीमागे सरदार पटेल फोटो लावून चालत नाही असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला