श्रीकांत ठरला जागतिक बॅडमिंटनची फायनल गाठणारा पहिला भारतीय पुरुष

नवी दिल्ली – भारताचा बॅडमिंटनवीर किदाम्बी श्रीकांतने नवा इतिहास घडवला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात एकेरीची फायनल गाठणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याने भारताच्याच लक्ष्य सेनचे कडवे आव्हान मोडीत काढून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. किदाम्बी श्रीकांतने उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर १७-२१, २१-१४, २१-१७ असा विजय संपादन केला, पण हा सामना जिंकण्यासाठी त्याला ६८ मिनिटे संघर्ष करायला लागला. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे लक्ष्य सेनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. जागतिक बॅडमिंटनचे कांस्य पदक मिळवणारा तो प्रकाश पदुकोण आणि बी. साई प्रणीत यांच्यानंतर तिसरा भारतीय पुरुष ठरला. प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली आणि प्रणीतने २०१९ साली जागतिक बॅडमिंटनचे कांस्य पदक पटकावले होते.
अंतिम फेरीतील किदाम्बी श्रीकांतचा सामना आता डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन आणि सिंगापूरचा केन येव लोह यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश करीत देशासाठी दोन पदकांवर शिक्कामोर्तब केले होते. पराभवानंतर लक्ष्य सेनला आता कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम सामन्यात सुवर्ण पदकाची कामगिरी करीत इतिहास रचण्याची संधी किदाम्बी श्रीकांतला आहे, तसेच कांस्य पदक पटकावणाऱ्या लक्ष्य सेननेही आपले नाव विक्रम पुस्तिके मध्ये नोंदवले आहे. लक्ष्य सेनने दिग्गज प्रकाश पदुकोण आणि बी साई प्रणीत यांच्या यादीत स्थान मिळविले आहे. प्रकाश पादुकोण यांनी १९८३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तर प्रणीतने २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …