ठळक बातम्या

शॉर्टकट नको, सरळ जा

सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी आपल्याकडे म्हण आहे; पण सरकारी कार्यालयात गेल्यावर आपली कामे वेळेवर आणि योग्य मुदतीत होण्यासाठी काय केले पाहिजे हे न समजल्यामुळे अनेकांची कामे खोळंबतात. अमूक एक काम आहे, त्यासाठी तमुक एका सरकारी कार्यालयात गेलो; पण काम काही होत नाही. आज या, उद्या या असे सांगून परत पाठवतात, अशा तक्रारी अनेक जण करतात; पण काही लोकांची कामे सहज आणि वेळेवर होतात. काही लोक पैसे देऊन कामं करून घेण्यात धन्यता मानतात. ही सवय आपणच लावतो आणि नंतर भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडत बसतो, अशी परिस्थिती आहे.
काही गोष्टी फोनवरून केल्या जात असतील, तर त्याबाबत काही भान आपल्याला पाळावे लागते. एखाद्या भागातील विद्युत पुरवठा बंद होतो. अशावेळी कोणी तरी वीज वितरण कंपनीच्या संबंधित कार्यालयात फोन लावतो आणि सांगतो, लाइट गेलीय, बघा काही होते का म्हणून. तो पलीकडून बोलणारा हो म्हणतो आणि फोन ठेवून जातो. काही झाले, तरी दुरुस्तीला कोणी येत नाही. सगळे जण त्या वीज वितरण कंपनीच्या नावाने ओरडू लागतात. हा प्रकार अनेक ठिकाणी घडतो; पण प्रत्यक्षात काय झालेले असते, तर आपण केलेली तक्रारच तिथे नोंदवलेली नसते. सरकारी कामाची दिरंगाई ही अशी होते.

यामध्ये संबंधित नागरिकाने तक्रार करताना, त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा जाणून घेणे आवश्यक असते. आपली लेखी तक्रार नोंदवली आहे की नाही, याची खात्री करून घेतल्यावर तक्रार क्रमांक किती आहे हे विचारले पाहिजे आणि ही तक्रार सोडवायला कोण येणार आहे, त्या वायरमनचे नाव विचारून घेतले, तर आपले काम पटकन होते. प्रत्यक्ष गेल्यावर तिथे त्या रजिस्टरमध्ये आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्याची आणि तक्रार क्रमांक आपल्याकडे लिहून ठेवला, म्हणजे होणारी दिरंगाई टळते. या साध्या साध्या गोष्टी असतात; पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माणसे स्वत:ला त्रास करून घेतात.
आज बहुतेक सरकारी खात्यांमधून केंद्र असो वा राज्य सरकार असो लेखीटाकी करायला माणसे टाळाटाळ करतात. आमची तक्रार तुम्ही नोंदवा, म्हणून आपण आग्रही राहिलो, तर आपली तक्रार लवकर निवारण होते; पण तक्रार नोंद वह्याच ठेवायच्या नाहीत, असा अलिखित नियम सरकारी कार्यालयांतून दिसत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठांना भेटून तक्रार नोंद वही का नाही, सूचना वही का नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे, तरच आपली कामे रेंगाळत नाहीत.

एखाद्या कामासाठी आपण एखाद्या सरकारी कार्यालयात पत्र देतो. ते पत्र दिल्यावर त्याचे उत्तर अनेक दिवस मिळत नाही, म्हणून आपण वैतागून जातो; पण त्याचवेळी आपल्या मागाहून पत्र दिलेल्यांची कामे झाल्याचे लक्षात येते. अशा परिस्थितीत आपले कुठे चुकले आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपण पत्र देताना त्या संबंधित व्यक्तीची पोहोच घ्यावी. ते पत्र त्या कार्यालयात आवक झाले आहे, याची खात्री करून घ्यावी आणि आवक क्रमांक व तारिख आपल्याकडे लिहून ठेवावी. पोहोच न दिलेली पत्रे ही आवक वहीत नोंदवायची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक पत्र अनुत्तरीत राहतात.
प्रशासनाला कामाला लावायचे असेल, तर आपण जागृत असणे गरजेचे आहे. कोणती छिद्र बाकी आहेत काय, याचा विचार करून कर्मचाºयांना पळवाटा काढायला संधी आपणच दिली नाही, तर कामं वेळेवर होतील. सरकारी कार्यालयात कोणत्याही लेखी नोंदीचा विचार आधी केला जातो. कानोकानी किंवा निरोप पाठवून तोंडी व्यवहाराला थारा नसतो. लेखी नोंदी करायला अनेकवेळा कर्मचारीवर्ग टाळाटाळ करतो; पण ती त्याची सोय असते. ठिक आहे. पाठवतो माणूस. असे सांगून तो अधिकारी तात्पुरती बोळवण करेल, पण काम लवकर झाले नाही म्हणून आपण विचारायला गेल्यावर तोच कर्मचारी प्रश्‍न करेल की, तुमची लेखी कम्प्लेंट आहे काय? आधीच्या लेखी कम्प्लेंट आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्या झाल्यावर तुमचं काम करतो म्हणून पुन्हा पिटाळून लावेल. यासाठी दफ्तरी नोंद करणे या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

एखादा घर खरेदीचा व्यवहार होतो, तेव्हा खरेदीखत झाल्यावर त्याची नोंद घराच्या आठ अच्या उताºयावर, ७/१२ वर किंवा शहरी भागात मिळकतीच्या कार्डावर (प्रॉपर्टी कार्ड) नोंद करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी विशिष्ठ प्रकारचा स्टॅम्प व्हेंडरकडून अर्ज लिहून घेऊन त्यावर कोर्ट फी स्टॅम्प लावून आपण तो नोंदवण्यासाठी सिटी सर्व्हेकडे देणे आवश्यक असते; मात्र अनेक जण खरेदीपत्र झाल्यावर आपले काम झाले, आपण मालक झालो समजून अंधारात राहतात. त्या मुख्य उताºयावर नोंद होणे महत्त्वाचे असते, हे लक्षात न घेतल्यामुळे एका जागेचे, एका घराचे अनेक व्यवहार करण्याचे प्रकार घडतात. सिटी सर्व्हेने दोन-दोन महिने नोंद केली नाही, म्हणून लोक ओरड करतात; पण सिटी सर्व्हेला दिलेल्या पत्राची पोहोच न घेतल्यामुळे हे प्रकार घडत असतात.
काही लोक उगाचच सरकारी कार्यालयात नको तिथे जातात. या टेबलवरून त्या टेबलवर फिरत राहतात. प्रत्येक टेबलवरचा माणूस वेगळ्या माणसाकडे बोट दाखवत राहतो. हा प्रकार टाळण्यासाठी चौकशी लिहिलेल्या टेबलवर जर आधी हे काम नक्की कोणाकडे गेल्यावर पूर्ण होईल हे विचारून त्या चौकशी टेबलवर माहिती दिलेल्या व्यक्तीकडे जावे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तरीही त्या व्यक्तीने माझ्याकडे नाही, तर दुसºया टेबलवर जा असे सांगितले, तर आक्रमकपणा दाखवावा लागेल. तुमच्या कार्यालयातील चौकशी टेबलावर माहिती विचारल्यावर त्या व्यक्तीने तुमच्याकडून काम होईल सांगितले आहे. अशी चुकीची माहिती देणाºयावर मी काय कारवाई करावी, असे खडसावून विचारल्यावर तो अधिकारी नरमाईची भूमिका घेईल आणि तुमचे काम पटकन करून देईल.

आपण योग्य त्या मार्गाने आलो आहोत, हे दाखवून दिल्यानंतर सरकारी कार्यालयांना त्यांचे काम योग्य पद्धतीने करणे भाग पडते, हे ध्यानात घेतले पाहिजे. अनेक लोकांना शासकीय कार्यालयातील शिपायांशी ओळख वाढवून त्यांच्यामार्फत कामे करून घेण्याची सवय असते. शिपायामार्फत अनेक फायलींमधून आपली फाइल घुसवायची आणि त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करायची सवय असते. त्या अधिकाºयापर्यंत फाइल पोहोचवली, म्हणून शिपायाला खूश करायचे आणि अधिकाºयांच्या केबिनमध्ये घुसायचे असे प्रकार अनेक जण करतात. हे प्रकार प्रत्येकाने टाळले पाहिजेत. फाइल जेथून येत असतात, त्या फाइलवर काही तरी प्रत्येक टेबलने शेरे मारलेले असतात. त्याची छाननी केलेली असते. ती पुढे पाठवण्यास योग्य असली, तरच ती पुढे पाठवली जाते. अशी शेरे न मारता मध्येच घुसलेली फाइल आली की, त्यात अनेक चुका निघतात, त्याची बोलणी ज्याने फाइल पाठवल्या त्या व्यक्तीला खावी लागतात.
नियमबाह्य काम आपण करून घेत नाही ना याचा तपास करावा आणि सगळं व्यवस्थित असतानाही कामाला खरोखरच दिरंगाई होत आहे काय, याचा तपास घ्यावा लागेल. प्रत्यक्षात योग्य पद्धतीने निवेदन झाले, तर काम वेळेतच होणार याची खात्री बाळगायला हवी आणि मगच संघर्ष करायला सिद्ध व्हावे. यासाठी सरकारी कामाची पद्धती समजून घेणे आवश्यक आहे. शॉर्टकट काढायला गेलो, तर काम रेंगाळत राहणार.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …