शेअर बाजारात तेजी परतली

मुंबई – देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण घेत असलेल्या भांडवली बाजारात आता तेजी परतली असल्याचे दिसून येत आहे. परंतु, अद्यापी कोरोना आणि ओमिक्रॉनचे सावट असल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेत विक्री-खरेदीचा संमिश्र व्यवहार केला. परंतु, बाजारातील परिस्थितीनुसार तेजीने आता जोर धरला असल्याचे दिसून येत असून, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आलेल्या जोरदार मागणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४.७२ अंकांनी वधारत ५७,३१५.२८ वर तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११७.१५ अंकांनी उसळी घेत पुन्हा १७ हजारांवर पोहचत १७,०७२.६० वर स्थिरावला आहे.
जागतिक पातळीवर अद्यापी कोरोना आणि ओमिक्रॉनचे सावट आहे. त्याचबरोबर भारतातही दोन्ही महासाथीच्या आजाराची धास्ती आहे. महागाईत सातत्याने होणारी वाढ आणि अर्थव्यवस्थेला खिळ बसण्याची भीती, अशा दुहेरी संकटात असताना देखील नाताळाचा उत्साह जगभरात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारात देखील उमटल्याने मागील तीन दिवसांपासून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. गुरुवारी देखील तेजीने अधिक जोर धरला. अमेरिकेचा तिसऱ्या तिमाहीचा जीडीपी दर २.३ टक्के इतका राहिला आहे. अपेक्षेपेक्षा जीडीपी दर अधिक राहिल्याने जागतिक पातळीवर तेजीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे अमेरिकेत कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी जीडीपीच्या आकडेवारीमुळे गुंतवणुकादारांनी खरेदीकडे मोर्चा फिरवल्याने त्याचे पडसाद इतर बाजारात देखील उमटू लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडीमुळे आयटी, वित्त आणि वीज कंपन्यांचे समभाग वधारले. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत झाल्याने गुंतवणुकदारांना अधिकच बळ मिळाले. निफ्टीने पुन्हा १७ हजारांची पातळी ओलांडली आहे, तर सेन्सेक्सने देखील ५७ हजार अंकांपर्यंत मजल मारली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …