शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट; शीना बोरा जिवंत आहे, काश्मिरात जाऊन तिचा शोध घ्या

शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट
शीना बोरा जिवंत आहे, काश्मिरात जाऊन तिचा शोध घ्या

तुरुंगात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीचे सीबीआयला आवाहन
मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध शीना बोरा हत्याकांडात आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. भायखळा तुरुंगात बंद असलेल्या इंद्राणीने दावा केला आहे की, तिची मुलगी जिवंत असून ती काश्मीरमध्ये दिसली आहे. इंद्राणीवर आपल्या मुलीची कारमध्ये गळा आवळून हत्या करणे आणि तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याचा आरोप आहे.

इंद्राणी मुखर्जीच्या वतीने सीबीआय डायरेक्टरला लिहिलेल्या पत्रात हा दावा करण्यात आला आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, ६ वेळा वेगवेगळी कारणे देऊनही इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या पत्रात इंद्राणीने म्हटले आहे की, ती नुकतीच तुरुंगात एका महिलेला भेटली होती, जिने तिला काश्मीरमध्ये शीना बोराला भेटल्याचे सांगितले होते. त्यामुळे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा.
ही माहिती अशीही समोर येत आहे की, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपूर्वी म्हणजेच २८ डिसेंबरला ही माहिती इंद्राणीच्या वतीने न्यायालयासमोर ठेवली जाणार आहे. या पत्रातील मजकूरही त्याच दिवशी न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे. सीबीआयने शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच सीबीआयने मुंबईच्या विशेष न्यायालयात म्हटले होते की, २०१२ मध्ये झालेल्या या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे. सीबीआयने या प्रकरणी तीन आरोपपत्रे आणि दोन पुरवणी आरोपपत्रे दाखल केली आहेत, ज्यात इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, पहिला पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांची आरोपी म्हणून नावे आहेत.

शीना बोरा हत्याकांड तेव्हा उघडकीस आले, जेव्हा पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह अटक केली. चौकशीदरम्यान रायने सांगितले की, २०१२ मध्ये इंद्राणी मुखर्जीने कारमध्ये गळा आवळून शीनाची हत्या केली होती. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा पहिला पती संजीव खन्ना यालाही मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
इंद्राणीने तिचा दुसरा पती पीटर मुखर्जीला शीना आपली बहीण असल्याचे सांगितले होते. शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल मुखर्जी यांच्यातही जवळीक होती. २०१२ मध्ये शीना अचानक गायब झाल्यानंतर राहुलने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. २०१५ मध्ये जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा तपासात उघड झाले की, इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरला. शीना बोराचे अवशेषही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मात्र, इंद्राणीने ते फेटाळून लावले.

इंद्राणीनंतर सीबीआयने तिचा दुसरा पती पीटर मुखर्जी यालाही अटक केली होती, ज्याला २०२० मध्ये जामीन मिळाला होता. खटल्यादरम्यानच इंद्राणी आणि पीटरचा घटस्फोट झाला.

 

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …