मुंबई – राज्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर शेलार यांनीही हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात सादर केला आहे, मात्र आता आशिष शेलार यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला. मग शेलार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर सेना-भाजपमधील वाद शमत असतानाच आता पुन्हा एकदा शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारे बॅनर थेट मुंबईत नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावले आहे. ‘कसं काय शेलार बरं हाय का?, काल काय ऐकलं ते खरं हाय का?, काल म्हणं तुम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला’, असं बॅनरमध्ये म्हटलं आहे.
नितेश राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर
या बॅनरबाजीवरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकरांबद्दल आशिष शेलार यांनी जे म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचलेली आहे. रात्रीच्या वेळी येऊन बॅनर लावायचे आणि स्वत:ला वाघ म्हणून म्याव-म्याव करायचे, अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. नाच्याचा उरलेला पक्ष म्हणजे शिवसेना. त्या पक्षात वरपासून खालपर्यंत सर्व नाचेच भरलेले आहेत. पुढच्या वेळी बॅनर लावताना ज्यांनी बॅनर लावलेत त्यांची खाली नावे दिली असती, तर नाचे कशाला म्हणतात हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.