शिर्डी – शिर्डी साईबाबा संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिला भक्तांना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ आणि फोटोज पाठवले आहेत. याप्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाग्यश्री बानायत यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या रहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
श्री साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण आहे. जनसंपर्क कार्यालयात अनेक भाविक आरती आणि दर्शन पाससाठी येत असतात. आरती आणि दर्शनाच्या नावाखाली जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मुंबई तसेच आसाम, गुवाहाटी येथील साईभक्त महिलांशी जवळीक तयार केली. नंतर या अधिकाऱ्याने संबंधित महिलांना मोबाईलवरून अश्लील चित्रफित आणि मेसेज पाठवले. यासंदर्भात सदर महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या महिलांना अश्लील चित्रफित (व्हिडीओ), फोटो पाठवल्याप्रकरणी संबधित जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच या संदर्भात शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी स्वाती परदेशी यांनी साईबाबा संस्थानला निवेदनातून केली आहे.
साईबाबा संस्थान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी असे विचित्र प्रकार घडू नयेत. आपण एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशा महिला अधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून महिला भक्तांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच तदर्थ समितीचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि अहमदनगर पोलीस प्रमुखांना पाठवण्यात आली असल्याचे परदेशी यांनी सांगितले आहे. या प्रकरणावर शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सध्या तरी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिला साईभक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. त्यांनी साईबाबा संस्थानला लेखी तक्रार दिली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …