ठळक बातम्या

शारदेच्या दरबारात शरदाचे चांदणे

महाराष्ट्रातील शंभर वर्षांहून जुन्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक रविवारी पार पडली. ३४ पैकी ३१ सभासदांनी मतदान केलं. यात शरद पवार यांचा विजय झाला. ते अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार होते. २९ मतं शरद पवार यांना, तर २ मतं ‘आप’चे उमेदवार धनंजय शिंदे यांना मिळाली आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक जिंकून शरद पवार यांनी या वयात एक फार मोठे काम केलेले आहे. खरं तर शरद पवार आजवर कोणतीच निवडणूक हारलेले नाहीत. विधानसभा, लोकसभा निवडणुका हा त्यांच्यासारख्या नेत्याला हातचा मळ असतो; पण तरीही सामान्य माणसांच्या दृष्टीने असलेली ही निवडणूक किरकोळ होती. त्यात शरद पवारांनी का उतरावे, असा प्रश्नही अनेकांना पडलेला असेल; पण कोणतीही निवडणूक जिंकणे आणि ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक यात फार फरक आहे.
जगात सगळ्यात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदीही निवडून येऊन शरद पवार यांना हे ग्रंथ संग्रहालयाचे महत्त्व का वाटावे, असा किरकोळ प्रश्न सर्वांना पडणे स्वाभाविक आहे. लाखो मतदार असलेल्या मतदारसंघाची निवडणूक लढवणारे शरद पवार फक्त ३४ मते असलेल्या ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक कशी काय लढवतात, अशी शंकाही कोणाला येईल. पण खासदार, आमदार, बीसीसीआयपेक्षा कितीतरी हे मोठे पद आहे. ही निवडणूक जिंकल्याने लक्ष्मीपुत्र असलेला हा जाणता राजा शारदेच्या प्रांगणात आलेला आहे. लक्ष्मीला सरस्वतीची साथ लाभली, तर दोघांचेही महत्त्व वाढते. त्यामुळे शारदेच्या प्रांगणात शरदाचे चांदणे हे अश्विन महिन्यातील शरद ऋतूत येणे हे खºया अर्थाने जिवेत शरद: शतम, असे आहे.
मुंबईतील एका मराठी ग्रंथालयाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिंगणात शरद पवारांसारखे दिग्गज नेते, तर उपाध्यक्षपदासाठी माजी आमदार विद्या चव्हाण, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्यासारखे राजकीय नेते उतरल्यानं अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे; पण ज्यांना आश्चर्य वाटेल त्यांना ग्रंथालयाचे महत्त्व पटले नाही, असेच म्हणावे लागेल. एका ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी एवढी राजकीय मंडळी कशासाठी? असा सामान्य प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामुळेच ही निवडणूक सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत होती. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक प्रक्रियाच अवैध आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसंच, राजकारण्यांचा हा प्रयत्न ग्रंथालयासाठी नसून भूखंडासाठी आहे, असाही आरोप करण्यात येतोय; पण हे तितकेसे खरे नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ग्रंथ संग्रहालय आहे. मुंबईत याच्या ३१ विभागीय शाखा कार्यरत आहेत. इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ या ग्रंथालयाशी संलग्न शाखा आहेत. या ग्रंथ संग्रहालयात २ लाखांहून अधिक ग्रंथ संपदा आहे. त्यात पुस्तकांसह साप्ताहिकं आणि मासिकंही आहेत, तसंच जवळपास १२ हजार दुर्मीळ ग्रंथांचा ठेवा आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना १ आॅगस्ट, १८९८ रोजी झाली. दादर येथे याचे मध्यवर्ती कार्यालय आहे. याचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं. जवळपास गेल्या ४० वर्षांपासून शरद पवार या ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेसुद्धा या ग्रंथालयाच्या विश्वस्त मंडळावर आहेत. अध्यक्षपदासह ७ उपाध्यक्षांचीही निवडणूक झाली. यासाठी काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विद्या चव्हाण, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, असे एकूण १४ उमेदवार रिंगणात होते, परंतु या पदांच्या निवडणुकीसाठी केवळ ३४ जण मतदान करू शकत होते. यामुळेच या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. ग्रंथालयाचे आजीव सदस्य अनिल गलगली यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. इतर सभासदांना तसंच प्रत्यक्ष उमेदवारांनाही मतदानाचा अधिकार का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा आरोपही केला; पण ग्रंथालयाची निवडणूक जिंकून शरद पवारांनी आपले सर्वोच्चपद सिद्ध केलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते की, देवालयातील रांगा जेव्हा ग्रंथालयाकडे वळतील तेव्हा खºया अर्थाने देश विकसित झाला, असे म्हणता येईल. मंदिरापेक्षा त्यांनी ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले होते. समृद्ध राष्ट्राचे वैभव हे ग्रंथालय असते. त्यामुळे शरद पवारांनी इथे असणे महत्त्वाचे आहे. ही निवडणूक जिंकून त्यांनी शारदीय प्रांगणातील आपले अस्तित्व अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मध्यवर्ती कार्यालय दादर पूर्वेला आहे. प्रसिद्ध शारदा टॉकीजला लागून हे ग्रंथ संग्रहालय आहे. शारदा टॉकीज गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हा भूखंड पुनर्विकासासाठी उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रंथ संग्रहालयाच्या भूखंडावर राजकारण्यांचा डोळा असल्याचा आरोप गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की, एका ग्रंथ संग्रहालयासाठी राजकीय दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात का आहेत? असा प्रश्न पडतो. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण, अनिल देसाई, भालचंद्र मुणगेकर यांनाही या संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी बनवलं आहे. हे सर्व प्रयत्न कशासाठी सुरू आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक शरद पवार यांच्यामुळे गाजत आहे. पवार यांचा डोळा या संस्थेच्या भूखंडावर आहे, असा आरोप विरोधी कार्यकर्ते करत आहेत. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. शरद पवार यांनी याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी काही लोकांनी केलेली आहे; पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नाही. शरद पवारांचे वाचन, अभ्यास त्यांची साहित्यिक मंडळीत असणारी उठबस ही सर्वांना माहिती आहे. अगदी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा यांच्यापासून सर्व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते, त्यांच्याशी ते विविध विषयांवर चर्चा करत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, हे नाकारून चालणार नाही.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …