व्हिव्होचा आयपीएलला ‘टाटा’

नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा उद्योग समूहाला यंदा इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व मिळाले आहे. टाटा उद्योग समूह आयपीएल प्रायोजकत्वासाठी चिनी मोबाइल निर्माती कंपनी व्हिव्होची जागा घेणार आहे. आयपीएलच्या संचालन परिषदेने मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, टाटा उद्योग समूह आता आयपीएलचे शीर्षक प्रायोजक असतील. टाटा उद्योग समूहाकडे दोन वर्षांकरिता आयपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व असेल.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा उद्योग समूह दोन वर्षांकरिता आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्व करारासाठी ६७० कोटी (प्रति वर्ष ३३५ कोटी) रुपये देणार आहे. त्यामध्ये ३०१ कोटी रुपये हक्क शुल्क तर ३४ कोटी रुपये सामन्यांची संख्या वाढल्याबद्दलचे असतील. तर व्हिव्हो कंपनी करार रद्द करण्यासाठी ४५४ कोटी रुपये देईल. व्हिव्होने करार रद्द केलेला असल्याने कंपनीला फरकाची रक्कम २०२२ साठी १८३ कोटी रुपये, तर २०२३ साठी २११ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय व्हिव्होला दोन्ही वर्षांसाठी सहा टक्के असाइनमेंट शुल्क द्यावे लागणार आहे. बीसीसीआयला २०२२ आणि २०२३ या सत्राकरिता या करारांतून ११२४ कोटी रुपये मिळणार आहेत.
व्हिव्होने २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता आयपीएलच्या प्रायोजकत्वाचे अधिकार २२०० कोटींना खरेदी केले होते. परंतु, गलवान खोऱ्यात २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर व्हिव्होने एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. या कालावधीत व्हिव्होच्या जागी ‘ड्रीम ११’ने आयपीएलचे प्रायोजकत्व केले. व्हिव्होने २०२१ मध्ये पुन्हा आयपीएल प्रायोजकत्व स्वीकारले. परंतु, व्हिव्हो योग्य बोली लावणाऱ्या समूहाला अधिकार हस्तांतरण करण्यास उत्सुक असल्याच्या अटकळी बांधल्या जात होत्या. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)ने त्याचे समर्थनही के ले होते. बीसीसीआयशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, आज नाही तर उद्या असे होणारच होते, कारण त्यामुळे लीग आणि कंपनी या दोघांचाही अपप्रचार होत होता. चिनी उत्पादनांसंबंधीची नकारात्मक भावना विचारात घेत व्हिव्होला करार कालावधी संपण्याच्या एक सत्र आधीच प्रायोक त्वापासून दूर व्हावे लागले. अर्थात या घडामोडींमुळे बीसीसीआयला कोणतेही नुकसान सोसावे लागणार नाही, कारण त्यांना अद्यापही ४४० कोटी रुपयांची वार्षिक प्रायोजकत्व रक्कम मिळणे निश्चित आहे. ही रक्कम आता नवे प्रायोजक देतील.
बीसीसीआय प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम स्वत:जवळ ठेवत असून, उर्वरित रक्कम आयपीएल फ्रँचायजींमध्ये वाटली जाते. दोन नव्या टीमचा आयपीएलमध्ये समावेश झाल्याने फ्रँचायजींची संख्या आता १० झाली आहे. बीसीसीआय आणि व्हिव्हो यांच्यातील करार २०२२ पर्यंत होता, परंतु एक वर्षाचा ब्रेक विचारात घेत ही मुदत २०२३ पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र व्हिव्होने प्रायोजकत्व सोडल्यामुळे टाटा उद्योग समूहाला २०२२ आणि २०२३ अशा दोन वर्षांकरिता आयपीएल प्रायोजकत्व मिळाले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी निवेदनात सांगितले की, बीसीसीआय आयपीएलसाठी हा महत्त्वपूर्ण क्षण आहे, कारण टाटा उद्योग समूहाला शंभर वर्षांहून अधिक जुना समृद्ध वारसा आहे आणि हा समूह सहा खंडांमधील १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला २०२२ मध्ये ५४७ कोटी रुपये, तर २०२३ मध्ये ५७७ कोटी रुपये मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिव्होने २०२२ आणि २०२३ साठी बीसीसीआयशी शीर्षक प्रायोजकत्वासाठी ९९६ कोटी रुपयांचा करार केला होता. आता आयपीएलमध्ये दोन टीम्सचा नव्याने समावेश झाला असल्याने त्याचे मूल्य वाढले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …