वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू, १६ जण जखमी

श्रीनगर – नव्या वर्षाची सुरुवात माता वैष्णोदेवीच्या दर्शनाने करण्याची मनिषा बाळगुन या तीर्थस्थळी आलेल्या भाविकांवर शनिवारी काळानेघाला घातला. वैष्णोदेवी मंदिरात शनिवारी रात्री अडीचवाजेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यूझाला,तर १६ जण जखमी झाले. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही चेंगराचेंगरी मंदिराच्या गर्भगृहाबाहेर गेट नंबर ३ जवळ पहाटे२:४५ च्या सुमारास घडली. काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेअसून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १२ लाख रुपये तर जखमींना २ लाख ५० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
जम्मूपासून ५० किमी अंतरावरील त्रिकुट पर्वतावर वैष्णोदेवीचे मंदिर आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवार-शनिवारच्या रात्री वैष्णोदेवीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही युवकांमध्ये बाचाबाची झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर प्रत्यक्षदर्शीने या घटनेसाठी सीआरपीएफचे जवान कारणीभूत असल्याचा दावा केला. तिसऱ्या क्रमाकांच्या गेटवर मंदिरात जाणाऱ्या आणि दर्शनाहुन परतणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांना पाऊल टाकण्यास देखील जागा नव्हती. त्याचवेळी सीआरपीएफचे जवान व्हीआयपी येत असल्याचे ओरडत दर्शनमार्ग मोकळा करण्यास सांगत होते. जवान हातातील काठी भाविकांवर उगारत होते. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यातच ढकलाढकलीमध्ये एक व्यक्ती खाली पडला आणि चेंगराचेंगरी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उत्तरप्रदेशातील ७, दिल्लीतील ३ आणि जम्मू-काश्मीर, हरयाणातील प्रत्येकी एका भाविकाचा समावेश आहे. सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. किरकोळ जखमी झालेल्या ६ भाविकांना प्रथमोपचारानंतर सोडण्यात आले. यांमध्ये दोघे मुंबईतील आहेत. मंदिर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून दर्शन पुन्हा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भाविकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून प्रत्येकी १० लाख तर पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख अशी १२ लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना काश्मीर प्रशासनाकडून प्रत्येकी दोन लाख आणि पंतप्रधान निधीतून ५० हजार रुपये देण्यात येतील. याशिवाय त्यांच्या उपचाराचा खर्च वैष्णोदेवी ट्रस्टकडून करण्यात येईल, असे सिन्हा यांनी सांगितले. कटरा शहरातील बेसकॅम्पपासून १३ किमी अंतरावर वैष्णोदेवी मंदिर आहे. काही भाविक हे अंतर पायी चालत पार करतात. तर काही जण हेलिकॉप्टरने थेट मंदिर परिसरात दाखल होतात.

पीएम मोदींकडून शोक व्यक्त
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दु:ख केले आहे. माता वैष्णो देवी भवनात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दु:ख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. देव जखमींना लवकर बरे करो. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत आणि मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
माता वैष्णोदेवी येथील दुर्घटनेमुळे उद्भावलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ताबडतोब कटरा येथे जात आहे. मी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यार आहे आणि पंतप्रधान मोदी यांना परत रिपोर्ट देणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …