ठळक बातम्या

वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?

रामदास कदमांचा आपल्याच सरकारला सवाल
मुंबई – खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी शुक्रवारी आपल्याच सरकारला घेरले. वैभव खेडेकरांना अपात्र करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला असताना त्यांना अपात्र का केले जात नाही? असा सवाल करतानाच खेडेकर काय तुमचे जावई आहेत का? असा सवाल रामदास कदम यांनी थेट आपल्याच सरकारला केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नगरविकास खात्यावरच हल्ला चढवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रामदास कदम यांनी विधान परिषदेत मनसेचे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतानाच या प्रकरणाकडे कानाडोळा करणाऱ्या ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला. नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. २० प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी ५० टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. २० पैकी ११ मुद्द्यांत ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने १५ दिवसांत त्यांना अपात्र केले पाहिजे, पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केले जात नाही. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का? असा सवाल कदम यांनी केला. त्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांनी खेडेकरांवरील तीन गंभीर आरोपांवर भाष्य केले.
खेडमध्ये भडगाव आहे. तिथे बौद्धवाडी असल्याचे दाखवून समाजकल्याणचा २० लाखांचा निधी आणून नाल्यावर पूल बांधला. बौद्धवाडीच्या नावाने खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा पूल बांधला. त्या इमारतीत त्याच्या पत्नीच्या नावाने (वैभवी वैभव खेडेकर) चार फ्लॅट आहेत. यासंबंधात मी सार्वजनिक बांधकामापासून सामाजिक न्याय विभागापर्यंत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली. या पुलाचा बौद्धवाडीसाठी उपयोग होत नाही, असे ग्रामपंचायतीने लिहून दिले. तसा ठरावच ग्रामपंचायतीने केला आहे. तिथे बौद्धवाडी नसल्याचे पंचायतीने सांगितले आहे.
खेड नगरपालिका ‘क’ वर्ग पालिकेत येते. नगराध्यक्षांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च असल्यामुळे नियमाने त्यांना एकही लिटर डिझेलही वापरता येत नाही, पण खेडेकरांनी स्वत:च्या गाडीसाठी साडेतीन लाख रुपये डिझेलसाठी वापरले. खासगी गाड्यांसाठी २३ लाख रुपयांचे डिझेल वापरले. हा भ्रष्टाचार होत असल्याने मी नगरविकास खात्याकडे तक्रार केली. खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. सभागृहाचे ठराव बदलणे, कंत्राटदारांच्या बिलावर एकट्यानेच सही करणे, असे अनेक मुद्दे आहेत. याप्रकरणी त्यांना दोषी ठरवले आहे, पण नगरविकास खात्याने हे प्रस्ताव दाबून ठेवले आहेत. नगरविकास खाते आमचे आहे, पण गंमत म्हणजे त्यांना अपात्र करणे राहिले बाजूला त्यांना संरक्षण दिले जात आहे. म्हणून सर्व मुद्दे सभागृहात मांडले, असे रामदास कदम यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …