ठाणे – सामनावीर ठरलेल्या समृद्धी राऊळच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने रिगल क्रिकेट क्लबचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती टी -२० महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात समृद्धी राऊळच्या चतुरस्त्र गोलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने रिगल क्रिकेट क्लबला १४.५ षटकांत अवघ्या ४२ धावांवर गुंडाळले. समृद्धीने ४ षटकांत केवळ ७ धावा देत ४ विकेट्स मिळवल्या. त्यापाठोपाठ रेश्मा नाईकने एक निर्धाव षटक टाकत ११ धावांत २ विकेट्स मिळवल्या. रिगल क्रिकेट क्लबच्या सृष्टी नाईकचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. विजयाचे हे छोटे लक्ष्य दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या मंजिरी गावडे आणि सानिका चाळके या सलामीच्या जोडीने पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ४४ धावा करत पूर्ण केले. मंजिरीने नाबाद १९ आणि सानिकाने नाबाद २२ धावा केल्या. अन्य लढतीत प्रार्थना साळगावकरच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टिंग युनियन संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबवर १६ धावांनी विजय मिळवला. प्रार्थनाने ४ षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स मिळवत साईनाथ स्पोर्ट्स क्लबला १९.२ षटकांत ११२ धावांवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याआधी फलंदाजीत स्पोर्टिंग युनियन संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २० षटकांत १२८ धावा केल्या. जुईली भेकरेने ४ चौकार मारत ४० धावा केल्या. रिषिता चौधरीने ३४ धावा ची भर टाकली. तन्वी परबने १६ धावांत २ आणि मिताली गोवेकर, रॉनीका लोपेझने प्रत्येकी एक विकेट मिळवली. साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या वेदिका पाटीलने १५ आणि प्राप्ती निबाडेने १७ धावा केल्या.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …