विश्व चॅम्पियनशिप: सिंधूपुढे विजेतेपद राखण्याचे आव्हान

हुवेला – स्पेनमध्येआज रविवार १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद राखण्याचेआव्हान भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसमोर असेल. इंडोनेशियाच्या खेळाडूंनी कोरोना संसर्गामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कमी झाली आहे, पण सिंधूला इतर प्रतिस्पर्ध्यांपासून धोका कायम आहे.सिंधूसहित या स्पर्धेत किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणय एकेरीत खेळताना दिसतील, तर पुरुष व महिला दुहेरीत अनुक्रमे सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि एन. सिक्की रेड्डी-अश्विनी पोनाप्पा यांच्यावर मदार असेल.
२०१९ मध्ये सिंधूने स्वित्झर्लंडमधील बॅसेल येथे पहिल्यावहिल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर कोरोनामुळे २०२० मध्ये स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पण, यंदाही स्पेनमधील स्पर्धेवर ओमायक्रॉनच्या रूपात कोरोनाचे सावट कायम आहे. सिंधू यंदाच्या हंगामात कामगिरीत सातत्य टिकवून आहे. जागतिक टूर फायनल्समध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच फ्रेंच, इंडोनेशिया मास्टर्स व इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत सिंधूने मजल मारली होती. महिला एकेरीत तीन वेळची चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मारिन दुखापतीमुळे घरच्या मैदानात खेळताना दिसणार नाही. तसेच २०१७ मधील विजेती जपानच्या नाजोमी ओसाकाने माघार घेतली आहे. लंडन ऑलिम्पिकची कांस्य पदक विजेती आणि २०१५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य पदकधारी भारताच्या सायना नेहवालनेही दुखापतीमुळे अंग काढून घेतले आहे. सिंधूकडे या परिस्थितीत विजेतेपद राखण्याची संधी आहे, मात्र थायलंडच्या पोर्नपावी चोचवोंग, तैवानच्या अव्वल मानांकन प्राप्त ताई जु यिंग व कोरियाच्या ॲन सियोंगकडून सिंधूला कडवे आव्हान मिळू शकते. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत मार्टिना रेपिस्काविरोधात तिचा सामना आहे. तिसऱ्या फेरीत सिंधू चोचवोंगशी भिडेल. त्यानंतर ताईिवरोधात सिंधू उभी राहील.
पुरुष एकेरीत १२ वे मानांकन प्राप्त श्रीकांत स्पेनच्या पाब्लोक अबेन आणि बी. साईप्रणित यांच्यापैकी एका विजेत्याशी लढेल. प्रणय पहिल्या फेरीत एनजी का लोंगशी भिडेल. लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. तसेच पुरुष दुहेरीतील रंकी रेड्डी-शेट्टी यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी पहिल्या फेरीतून माघार घेतली आहे. महिला दुहेरीत रेड्डी-पोनाप्पा यांच्या प्रतिस्पर्धीइंडोनेशियन जोडीनेही माघार घेतली आहे.त्यामुळे भारतीय या जोड्यांना पहिल्या सामन्यात बाय मिळाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …