दुबई – रविवारी पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाने मिळवला. दरम्यान, या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रत्येक क्रिकेटपटू जल्लोष करताना दिसले. ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करताना ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी चक्क बुटात बिअर ओतून ती पितानाचे असंख्य फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कांगारूंचे हे सेलिब्रेशन पाहता, त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते असेच साऱ्यांना वाटत आहे.
अंतिम सामना जिंकल्यानंतर झालेल्या जंगी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू चक्क बुटातून बिअर पिताना दिसून येत आहेत. वाचायला व ऐकायला हे विचित्र वाटत असले, तरी ते खरे आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चमकलेला मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी अशा प्रकारे आपला आनंद साजरा केला.