मुंबई – गुरुवारी पवई येथील हुंडाई कंपनीच्या शोरूमला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी विलेपार्ले येथील प्राइम मॉलला भीषण आग लागली. या आगीवर सुमारे दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असले, तरी यात दोन जण जखमी झालेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले ईला नाला येथे प्राइम मॉल आहे. तळ अधिक तीन मजले, असे एकूण चार मजल्यांचा हा मॉल आहे. या मॉलमधील पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केल्याने मुंबई अग्निशमन दलाचे १३ फायर इंजिन, ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तास या आगीशी झुंज देत त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर दुपारी १.२०च्या दरम्यान आगीवर सर्व बाजूने नियंत्रण मिळवण्यात यश आले. सदर आग अग्निशमन दलाच्या नियंत्रणात असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. या आगीत एक व्यक्ती तसेच एक अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे. ही आग का लागली याची चौकशी अग्निशमन दलाकडून केली जात असून, त्याचा अहवाल आल्यावर आगीची नेमके कारण समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेत धुरामुळे गुदमरल्याने एका व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव आहे. तो २० वर्षांचा आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी दिली. तर आग विझवताना मंगेश गांवकर हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. ते ५४ वर्षांचे असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.