ठळक बातम्या

विलिनीकरणासाठी ‘डंके की चोट पे’ आंदोलन – नवे नेतृत्व सदावर्तेंचा इशारा

मुंबई – एसटी कर्मचाºयांच्या संपावरून सुरू असलेला तिढा आणखीच वाढत चालला आहे. बुधवारी राज्य सरकार, एसटी महामंडळाने वेतन वाढ जाहीर केली. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाºयांच्या संपातून माघार घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि आ़ गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी केली. त्यांनी कर्मचाºयांनाही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र दोघांच्या आवाहनानंतर ही कर्मचारी संपावर ठाम आहेत. अशातच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संपाचे सूत्र हाती घेत आता विलिनीकरणासाठी आंदोलन ‘डंके की चोट पे’ असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांना एसटी आंदोलनातून आम्ही आझाद करत असल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी म्हटले.
राज्य सरकारने एसटी कर्मचाºयांसाठी घसघशीत पगार वाढ केल्याची घोषणा केली. त्यामुळे या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतले. सदावर्ते यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सुरुवातीलाच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा तुम्ही काय ते समजून घ्या. त्यांना सरकारने आपल्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. या खोत आणि पडळकरांना आम्ही आंदोलनातून आझाद केले आहे, असा घणाघात त्यांनी केला. कामगार नेते
दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर ७० वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे. आम्ही विलिनीकरणासाठी ‘डंके की चोट पे’ हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्मचाºयांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
सदावर्ते म्हणाले की, बुधवारी, दोन आमदार आणि ९ एसटी कर्मचारी या बैठकीला गेले होते. या बैठकीत कर्मचाºयांचा आवाज दाबण्यात आला. विलिनीकरणावर शिष्टमंडळ ठाम होते. या शिष्टमंडळाने बाहेर जाण्याचे ठरवले, मात्र त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप अ‍ॅड. सदावर्ते यांनी केला. २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधानचा गौरव दिवस आहे. या दिवशी राज्यातील २५० डेपोमध्ये सगळे कष्टकरी आपल्या कुटुंबांसोबत एकत्र येतील आणि भारतीय संविधान आंदोलन परिषद साजरी करतील, अशी घोषणा अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …