ठळक बातम्या

विलिनीकरणच का हवे एसटीला

का हट्टाला पेटलेत एसटी कामगार, त्याची अनेक कारणे आहेत. महाराष्ट्राला ती आता सांगावीच लागतील, म्हणून मी आज बोलतोय. मानवी जीवनात आज प्रवास अनिवार्य झाला आहे. अनेक साधनेसुद्धा उपलब्ध आहेत, परंतु वाढती महागाई राक्षसासारखी वाढतेच आहे.
त्यामुळे ९०% सामान्य जनता हवालदिल आहे. या जनतेला इंधन खर्च परवडेनासा आहेच, परंतु रस्त्यावरील वाढलेली रहदारीसुद्धा जीवघेणी ठरत आहे, तेव्हा गरज आहे ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची.

आज जी वाहतूक व्यवस्था आहे ती मरण पंथाला लागलेली आहे. १८ फोर्ड गाड्यांवरून सुरुवात झालेली वाहतूक व्यवस्था १८००० गाड्यांपर्यंत विस्तारीत झाली. तीच व्यवस्था आज हळूहळू १८००० वरून १४५०० पर्यंत मागे आली आहे. हे गंभीर दुर्लक्षाचे कारण आहे. आहेत त्या गाड्यासुद्धा सुस्थितीत नाहीत. साधे इंजिन आॅइल, स्टेअरिंग आॅइल खरेदी करण्याची क्षमता नसल्याने, वापरलेले आॅइलच परत वापरण्याची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा गरज भासते ती सरकारी मदतीची. पण प्रत्येक वेळी हात तरी किती पसरायचे, म्हणून विलिनीकरण हवे आहे. किती दिवस गुप्त प्रेमप्रकरण चालवायचे एकदाचे लग्नच करा. अर्थाने ही मागणी, परवा एका फाजील व्यक्तीने हसण्यासारखा प्रश्न विचारला. सरकारी उद्योग
खासगी केले की, कसे फायद्यात येतात म्हणे?, असा त्यांचा प्रश्न होता. खासगी मालक तो उद्योग म्हणून चालवतो, तेव्हा फायद्यात येतो आणि सरकार ना नफा ना तोटा तत्वावर सेवा म्हणून चालवते त्यातसुद्धा बकासुरासारखा भ्रष्टाचार फोफावला की, मग तोट्याचा ब्रम्हराक्षस

निर्माण होतो. बाबा संजया. हे भारतीय राजकारणाचे त्रिमितीय गणित आहे ते गणित कायमचे सुटावे म्हणून विलिनीकरण हवे.
लोकशाहीत जनता ही जनार्दनाचे रूप असते. जनार्दन खूश असेल, तर लक्ष्मीची सुद्धा कृपा होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, पण जनार्दनाला खूश करण्यासाठी अनेक योजना, अनेक नैवेद्य आणावे लागतात. पण ते इतरांचे घरातील जिन्नस आणून करावे लागू नयेत म्हणून विलिनीकरण हवे. कारण सोयी-सुविधा घेणारे जनार्दन. मतदानाचा व

सत्तेचा आशीर्वाद घेणारे सरकार आणि खिसा रिकामा होणार आमचा म्हणजे असे झाले, पाणपोई तुमच्या कैलासवासी पिताजींच्या स्मरणार्थ. त्याचे पुण्य तुमच्या पदरात आणि घागरी भरून खेपा मारणार आम्ही म्हणून विलिनीकरण हवे. अजून काय समजवायला हवे का?
– राजेंद्र पाटील/ एसटी कर्मचारी\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …