नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर भारताची प्रतिमा कलंकित करण्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली. लसीकरण कार्यक्रमासाठी जगभर भारताचे कौतुक होत असताना, लसीकरणाबाबत विरोधकांनी पहिल्यापासून शंका पसरवली, असंही सीतारामन म्हणाल्या. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची यादी सर्वांसमोर मांडली.
१०० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याबद्दल भारताने जो मार्ग अवलंबला, त्याची जगभरात प्रशंसा होत आहे. लसीकरण आणि एकूणच आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले, तसेच संरक्षण क्षेत्रात आणि लष्करात महिलांचा प्रवेश आणि सैनिक शाळांची स्थापना या ठरावाचा एक भाग होता. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हे आमचे ब्रीदवाक्य आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.
या बैठकीत भाजप नेत्यांनी लसीकरणाची संख्या आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत रेशनचे वाटप करण्यावर भर दिला आहे. लोकांच्या जीवाची काळजी घेत आम्ही ८० कोटी लोकांना ८ महिने अन्न दिले, तसेच वन नेशन, वन रेशन जारी करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या योजनेमुळे स्थलांतरित कामगारांना इतर राज्यांमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणी, तसेच त्यांची शिधापत्रिका नोंदणीकृत नसलेल्या ठिकाणी रेशन मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
आमच्या भ्रष्टाचारमुक्त सरकारने डिजिटल इंडियाद्वारे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे, असा दावा सीतारामन यांनी केला आहे. भारत सध्या खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहत आणि अनुभवत आहे आणि डिजिटल इंडिया मिशन त्याला गती देत आहे. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया मिशनमुळे भारताला अधिक बळकटी मिळेल, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.