विराट कोहलीने अखेर मौन सोडले

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यास तयार
मुंबई – भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली वनडे मालिकेत खेळणार की, नाही, यावरून सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर विराटनेच पूर्णविराम दिला आहे. ‘मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे. एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहे’ असे खुद्द विराटनेच बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. २६ डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी कोहलीने पत्रकार परिषद घेत याबाबतचे मौन सोडले व आपली भूमिका मांडली.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या मालिकेत खेळण्यास मी तयार आहे. विश्रांतीसाठी मी बीसीसीआयकडे वेळ मागितला नाही. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत, असे मत विराट कोहली याने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीने माघार घेतली आहे. जानेवारीत विश्रांती मिळावी अशी विनंती विराटने बीसीसीआयला केली आहे. ९ जानेवारीला विराटची लेक वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रेक द्यावा असे विराटने बीसीसीआयला कळवल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या.
मी नेतृत्व करणार नाही, हे आधीच सांगितले होते. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी मी उपलब्ध आहे. मी एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार नाही, हे निवड समितीच्या सदस्यांनी मला कळवले होते, असे विराटने सांगितले. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेच्या कर्णधारपदी विराटच्या जागी निवड समितीने रोहित शर्माची निवड केली आहे, तेव्हापासून वादाच्या वावड्या उठत आहेत, या सर्व प्रश्नांना विराटने पत्रकार परिषदेत उत्तरे दिली.
मी निवडीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही असे प्रश्न मला विचारू नयेत. उलट हे प्रश्न तुम्ही जे, मी उपलब्ध नाही, असे लिहितात त्यांना आणि त्यांच्या सूत्रांना विचारा. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध आहे, असे कोहलीने पत्रकारांना सांगितले. कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार नाही, त्याने ब्रेक मागितला आहे, अशी मंगळवारपासून मीडियामध्ये चर्चा होती. या चर्चेत अजिबात तथ्य नाही. मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी नेहमीच गंभीर होतो. जे खोट्या बातम्या लिहितात त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा असे विराट म्हणाला.
रोहितची उणीव जाणवेल
कसोटी मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीबद्दल विराट म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल. रोहितचा अनुभव आणि कौशल्याची उणीव भासेल, असे विराट म्हणाला. भारताच्या एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मासोबत माझे कुठलेही मतभेद नाहीत, असे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एकच गोष्ट वारंवार सांगून मला कंटाळा आलाय, असे विराट या मुद्द्यावर बोलताना म्हणाला. रोहित आणि माझ्यामध्ये सर्वकाही सुरळीत आहे, असे सांगत सुरू असलेल्या अफवांचे विराटने खंडन केले. रोहित आणि माझ्यामध्ये कुठलीही समस्या नाही. प्रामाणिकपणे मागील अडीच वर्षांपासून मी हीच गोष्ट सांगत आहे. मला आता हे सांगून कंटाळा आलाय. मला एकच प्रश्न सारखा विचारला जातो. मी एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगतो, जोपर्यंत मी क्रिकेट खेळेन, तोपर्यंत माझी कृ ती आणि संवाद यातून संघाला कधीच खाली खेचणार नाही, असे विराटने सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …