दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरूच
मुंबई – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच अनेक घडामोडी समोर येत आहेत. टीम इंडियामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समजत आहे. कारण, दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी, विराट कोहलीने मुंबईतील सराव सत्र वगळले त्यामुळे तो बीसीसीआयवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता त्याने, एकदिवसीय मालिकेमधूनही माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. एकदिवसीय क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे.
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या कसोटी संघाचा भाग आहे आणि तो त्याचा कर्णधार देखील आहे, परंतु त्याने आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ला एकदिवसीय संघात खेळणार नसल्याचे सांगितले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेपूर्वी, मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याच्या बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर संघामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, खुद्द विराट कोहलीने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे म्हटले जात आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका वगळण्याच्या त्याच्या निर्णयाचा कर्णधार बदलाशी काहीही संबंध नाही.
विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे. गेल्या वर्षी ११ जानेवारीला वामिकाचा जन्म झाला. कसोटी मालिका संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याचे नियोजन विराट कोहली करीत असल्याचे सांगितले जाते. या दौऱ्यातील अंतिम कसोटी ११ ते १५ जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या जागी ओपनर रोहित शर्माला वनडे टीमचा नवा कर्णधार बनवल्यापासून विराट बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे तीन महिन्यांपूर्वी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने एकदिवसीय आणि कसोटीत कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु बीसीसीआयने त्याचे ऐकले नाही.
अझरुद्दीन उवाच…
नवी दिल्ली – ब्रेक घेण्यात काहीच चुकीचे नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने व्यक्त केले आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अझरुद्दीनने हे मत व्यक्त केले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे विराट कोहलीने बीसीसीआयला कळवले आहे. रोहित शर्मा सुद्धा कसोटीमध्ये खेळणार नाही. ब्रेक घेण्यात काहीच चुकीचे नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे. या अशा घडामोडी मतभेदांच्या चर्चांना अधिक बळकटी देणाऱ्या आहेत, असे मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘ब्रेक’साठी औपचारिक विनंती केलेली नाही – बीसीसीआय अधिकारी
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)च्या एका प्रमुख अधिकाऱ्याने म्हटले आहे की, कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिके च्या आगामी दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेण्यासंदर्भात कोणतीही औपचारिक विनंती केलेली नाही. कोहली सेंचुरियनमध्ये २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोट्यांच्या मालिकेमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. कसोटी मालिका केपटाऊनमध्ये १५ जानेवरीला तिसऱ्या आणि अंतिम कसोटीने संपणार आहे. त्यानंतर १९ जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेणार असल्याची बातमी आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये न खेळण्याबाबत अद्यापपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली अथवा सचिव जय शाह यांना कोणतीही औपचारिक विनंती पाठविलेली नाही. आजच्या स्थितीनुसार तो १९, २१ आणि २३ जानेवारीला होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.