ठळक बातम्या

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का नागपूर, अकोल्यात भाजपने मारली बाजी! बावनकुळे, खंडेलवाल विजयी


मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून, देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपकडून मतदारांनी सत्ताधाºयांना नाकारल्याची टीका केली जात आहे. विधान परिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, मात्र नागपूर आणि अकोला या जागांसाठी एकमत होऊ न शकल्यामुळे या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये नागपुरात एकूण ५४९ मते वैध ठरल्याचे निवडणूक अधिकाºयांनी जाहीर केले. त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी २७५ मते मिळवणे आवश्यक होते. यात भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना एकूण ३६२ मते मिळाली असून, रवींद्र भोयर यांना अवघे एक मत मिळाले आहे, तर काँग्रेसचे उमेदवार असलेले मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली आहेत. नागपुरात काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असताना दुसरीकडे अकोल्यातही हेच चित्र दिसून आले. अकोल्यातील मतमोजणी पूर्ण झाली, तेव्हा भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात तब्बल ४४३ मते पडली होती, तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते पडली होती. या प्रक्रियेमध्ये ३१ मते बाद ठरली.
नागपूरमध्ये काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलल्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचे आता बोलले जात आहे. आधी छोटू भोयर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे भोयर यांना या निर्णयाविषयी कोणतीही कल्पना नसल्याचे नंतर समोर आले.
या विजयाविषयी प्रतिक्रिया देताना भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ३१८ मते भाजप आणि सहयोगी पक्षांकडे होती. २४० मते महाविकास आघाडीकडे होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १८६ मते मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मत त्यांना मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हुकूमशाही भूमिका, दोन मंत्र्यांच्या दबावाखाली पक्षाला वेठीस धरणे, काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते, मतदार अस्वस्थ होते. हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे हे परिणाम आहेत. यात त्यांनी आत्मचिंतन करायला हवे की आपली मते का फुटली. दोन दिवस त्यांनी घोडेबाजार केला, तरी त्यांना पक्ष एकत्र ठेवता आला नाही. हा खºया अर्थाने काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव आहे. त्यांचे कार्यकर्ते इमानदारीने काम करण्यासाठी तयार होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाही. त्यांनी हतबल प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे, असे ते म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …