* २९ नोव्हेंबरला मतदान
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी असणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे २४ ऑक्टोबरला निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यापोटनिवडणुकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दरम्यान, काँग्रेस या जागेसाठी विधान परिषदेवर कुणाला पाठवणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद रणपिसे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. रणपिसे हे १९७९-८५ या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५ मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळावर सदस्य होते. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले.