विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी द्यावी लागणार प्रवेश परीक्षा?

  •  युजीसीचे विद्यापीठांना पत्र

नवी दिल्ली – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) केंद्रीय विद्यापीठांना पत्र लिहिले आहे. २०२२-२३ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठांची इच्छा असल्यास त्यांनी संगणक आधारित प्रवेश परीक्षा घ्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. प्रवेश परीक्षांचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून १३ प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पहिल्या टप्प्यात ४५ केंद्रीय विद्यापीठांना २०२२-२३ पासून प्रवेश परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रवेश परीक्षेसंदर्भात अतिरिक्त माहिती डिसेंबरमध्ये जाहीर केली जाणार आहे. युजीसीने केंद्रीय विद्यापीठांना यासंदर्भातील पत्र पाठवले आहे, तसेच युजीसीने केंद्रीय विद्यापीठांना लिहिलेल्या पत्रानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षांचे आयोजन या वर्षीपासून करण्यात येत होते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला; मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे २०२२-२३ पासून प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यापीठातील प्रवेश परीक्षा ही तीन तासांची असण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्यापीठ जेएनयु आणि दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठातील प्रवेश परीक्षेप्रमाणे तीन तासांची प्रवेश परीक्षा असेल. यामध्ये दोन विभाग असतील, त्यातील पहिल्या विभागात सामान्य क्षमता चाचणीसाठी ५० प्रश्न आणि अभ्यासक्रमासाठी ३० गुण निश्चित करण्यात आल्याची शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …