ठळक बातम्या

वादाच्या भोवºयात साहित्य संमेलन

नाशिकमध्ये येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे, पण अगदी सुरुवातीपासून काही ना काही वाद, अडथळे या संमेलनाच्या आयोजनात उद्भवले आहेत. अर्थात गेल्या काही वर्षांपासून वादाशिवाय साहित्य संमेलन होतच नाहीये. किंबहुना साहित्य संमेलनाचा राजकीय भूमिकेसाठी होत असलेला वापर हे त्यामागचे कारण असावे, पण नाशिकचे साहित्य संमेलन हे होण्यापूर्वीच जास्त गाजते आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखा चांगला अध्यक्ष लाभला असताना होणारे हे वाद घृणास्पद असे आहेत.
९४ व्या साहित्य संमेलनासाठी सुरुवातीपासूनच दिल्ली आणि नाशिक ही दोन नावे चर्चेत होती. संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ या दोन संस्थांनी प्रस्ताव पाठवले होते, तसेच दिल्लीच्याही सरहद संस्थेने प्रस्ताव पाठवला होता. साहित्य महामंडळाचा कल नाशिककडे झुकायला लागल्यानंतर सरहद संस्थेने महामंडळाला पत्र पाठवून आपल्या प्रस्तावाची आठवणही करून दिली होती, पण तो वाद थांबला आणि नाशिकचे स्थान नक्की झाले, पण तरीही वाद काही मिटेनात.

खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे मोठे इव्हेंट रद्द झाले, गर्दीवर मर्यादा आल्या, अशात यंदाचे साहित्य संमेलन होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते. सुरुवातीला साहित्य संमेलन नको, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने घेतली होती. याच वर्षी मार्चमध्ये २६, २७ आणि २८ या तारखांना संमेलन होणार हे ठरले होते, पण त्याचवेळी भारतात कोरोनाच्या दुसºया लाटेने कहर माजवायला सुरुवात केली होती. नाशिकच्या माध्यमांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच या संमेलनाच्या आयोजनाविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यामुळे मार्चमधले संमेलन रद्द झाले, ते आता अडथळ्यांची शर्यत पार करत या आठवड्यात होणार आहे.
यादरम्यान जून महिन्यात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी साहित्य संमेलनच्या आयोजकांच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला. संमेलन कमी खर्चात व्हावे असे ठरलेले असतानाही लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी अंदाजपत्रकात वारंवार बदल करत आहेत ते संशयास्पद वाटतेय असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही याबद्दल स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण मंडळाच्या अध्यक्षांनी तो होऊ दिला नाही, असेही ठाले-पाटील म्हणाले होते. त्यामुळे हा एक नवा वाद संमेलनापूर्वीच निर्माण झाला. यावर लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले होते की, मुळातच संमेलनाच्या आयोजनासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे काही खर्च मागेपुढे झाला. आधीची जागा वेगळी होती, त्यामुळे खर्च वेगळा होता, आता वेगळी जागा असल्याने खर्चात वाढ झालेली आहे. खरंतर हा वादाचा विषय नव्हता, पण उगाच त्यावर चर्चा झाली आणि अंतर्गत हेवेदावे पुढे आले.

त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आयोजकांना पत्र पाठवून ‘साहित्य संमेलनाबाबत तुमची भूमिका ३१ जुलैपर्यंत स्पष्ट करा, नाहीतर तुम्हाला आयोजनात रस नाही असे समजून दुसरीकडे साहित्य संमेलन घेण्याबाबत विचार करावा लागेल,’ असे म्हटले. या पत्रात ठाले-पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. ते म्हणजे कोरोना काळात नाशिकमध्ये साहित्य संमेलन होऊ शकते का?, याबाबत नाशिककरांची मनस्थिती अनुकूल आहे का?, संमेलन घ्यायची लोकहितवादी मंडळ आणि स्वागत मंडळाची तयारी आहे का?
साहित्य संमेलनासारखे मोठे व्यासपीठ गमावतील तर ते राजकारणी कसले?, त्यातच ते जर छगन भुजबळ असतील तर ते ही संधी सोडणार का?, आता कोविडची दुसरी लाट या काळात नुकतीच ओसरली होती. त्यामुळे याला प्रत्युत्तर देताना नाशिकचे पालकमंत्री आणि जे संमेलनाचे स्वागताध्यक्षही आहेत छगन भुजबळ यांनी स्पष्ट म्हटले होते की, सध्या तरी संमेलनाचे आयोजन करणे अशक्य आहे. सरकारी निर्बंध उठल्यानंतर संमेलन घेण्यात येईल. संमेलन नाशिककरांमुळे नाही, तर कोविडमुळे थांबले आहे. अत्यंत मार्मिक उत्तर त्यांनी दिले होते.

त्यानंतर आॅगस्ट महिन्यात साहित्य महामंडळाने पुन्हा आयोजकांना पत्र पाठवून साहित्य संमेलन आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घ्या किंवा दिवाळीनंतर घ्या असे म्हटले होते. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर छगन भुजबळ यांनी आपला राग व्यक्त केला होता. हे साहित्य संमेलन आहे की, पत्रकबाजीचा आखाडा?, लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना आताच संमेलन घ्या, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मग इतक्या सगळ्या चर्चेनंतर नोव्हेंबर महिन्यातल्या १९, २० आणि २१ या तारखा साहित्य संमेलनासाठी ठरल्या. आॅगस्टमध्ये संयोजन समिती आणि साहित्य महामंडळ यांची बैठक झाली होती. त्यावेळी १९, २०२१, नोव्हेंबर या तारखांना संमेलन घेण्याबाबत संयोजन समितीने सांगितले होते. त्यानंतर महामंडळ आणि संयोजन समितीत पुन्हा चर्चा झाली. महामंडळाने या तारखा शासनालाही कळवल्या होत्या, पण नंतर याही तारखा पुढे ढकलून ३, ४, ५ डिसेंबरला संमेलन होणार हे निश्चित झाले. ही चंचलता सारस्वतांची नव्हती, तर राजकारण्यांची होती. सरस्वती स्थिर असते, पर लक्ष्मी चंचल असते, पण सरस्वतीच्या पुत्रांचा उत्सव हा लक्ष्मीपुत्रांच्या इच्छेवर होणार असल्याने ती या सारस्वतांना नाचवत होती असे चित्र इथे दिसून आले.
त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पुर्वार्धात ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत प्रसिद्ध केले. या गाण्यात नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा घेतला होता, पण यात मुळचे नाशिकचे असणाºया विनायक दामोदर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नव्हता. सावरकरांनी नाशिकमध्ये १९३८ साली झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषावले होते. या गाण्यात नाशिकमधल्या इतर साहित्यिकांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख होता, तसेच ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ या वाक्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वाक्याचा रोख छगन भुजबळांकडे होता. नंतर स्पष्टीकरण देताना या गाण्याचे गीतकार मिलिंद गांधी म्हणाले होते की, या गाण्यात ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे, तो स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी आहे. याविरोधात मनसेने पवित्रा घेतला होता. नाशिकला होणाºया साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख हवा होता, तसेच संमेलनाच्या कामकाज, विषय पत्रिका व उपक्रमांत कुठेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नाही. त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली पाहिजे होती. सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा अनुल्लेख योग्य नाही. यानंतर आयोजकांनी संमेलन गीतातली ही ओळ बदलली आणि ‘स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती’ अशी केली.

नाशिकच्या साहित्य संमेलनात सुरुवातीपासूनच राजकीय नेत्यांना स्थान असल्याचे दिसतंय. उस्मानाबादला झालेल्या ९३ व्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना व्यासपीठावर बसवले नव्हते, पण नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, असे कार्यक्रम पत्रिकेत दिले आहे, पण प्रकृतीच्या कारणामुळे ते खरंच येऊ शकतील की नाही हे अजून स्पष्ट नाही, पण वादाच्या भोवºयात हे संमेलन गटांगळ्या खात आहे हे नक्की.
– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …