– पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे – कोरोनामुळे संपूर्ण जगाप्रमाणेच आपल्या देशात लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊनने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक घर उद्ध्वस्त झाली. यावेळी उदरनिर्वाहासाठी काहींनी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केला. असाच प्रकार काहीसा सुसंस्कृत पुण्यातही घडला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या पती-पत्नीने चक्क चोरी करण्यास सुरुवात केली.
पुण्यातल्या समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. व्यवसायाने जिम ट्रेनर असलेला बाळासाहेब हांडे या व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परमार ज्वेलर्समध्ये बायकोच्या मदतीने दोन तोळ्याच्या मंगळसूत्राची चोरी केली होती. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब हांडे याला अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे उदरनिर्वाहासाठी काय करायचे, असा प्रश्न पडल्यामुळे पत्नीच्या सोबतीने त्याने चोरी करायला सुरुवात केली, अशी माहिती स्वत: बाळासाहेब हांडेने तपास यंत्रणांना दिली. बाळासाहेब हांडेला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र त्याच्या पत्नीला सहा महिन्यांचे मूल असल्यामुळे तिला केवळ नोटीस देण्यात आली. या जोडीने पोटभरण्यासाठी आतापर्यंत दोन ते तीन ठिकाणी अशाच पद्धतीने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.