ठळक बातम्या

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक * मुंबईसुद्धा टार्गेटवर?

नवी दिल्ली – पंजाबमधील लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. जर्मनी पोलिसांनी ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे) या प्रतिबंधित संघटनेशी संबधित जसविंदरसिंग मुल्तानीला अटक केली आहे. जसविंदरसिंग हा लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर तो दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. त्यासंदर्भात तो कट रचत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
जसविंदरसिंग मुल्तानी हा ४५ वर्षांचा असून, तो ‘एसएफजे’चे संस्थापक गुरपतवंतसिंग पन्नू यांचा निकटवर्तीय मानला जातो. जसविंदरसिंग याच्यावर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे. जसविंदरसिंग मुल्तानी यानेच सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते बलवीरसिंग राजेवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. त्याने जीवनसिंग नावाच्या व्यक्तीला त्यासाठी भडकवले होते. जीवनसिंगला बलवीरसिंग राजेवाल यांची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशातून हत्यारे देण्यात आली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच जीवनसिंगला अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी जसविंदरसिंग मुल्तानी याचे त्यावेळेस पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात नाव आले होते. तर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यानंतर ही माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना कळवली होती. शेतकरी नेते बलवीरसिंग राजेवाल यांना सुरक्षा घेण्यास सांगण्यात आले होते.
लुधियाना कोर्टातील दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये २३ डिसेंबरला (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू होते. या बॉम्बस्फोटात आयईडी (अद्ययावत स्फोटक उपकरण)चा वापर करण्यात आला होता. आयईडीचा वापर झाल्याने पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा संशय होता. त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते. टॉयलेटमध्ये बॉम्ब ॲसेंबल करताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. या बॉम्बस्फोटात न्यायालयाच्या संरक्षण भिंतीचे नुकसान झाले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचा फुटल्या होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …