ठळक बातम्या

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लान तयार

मुंबई – १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा ॲक्शन प्लान मुंबई महापालिकेने तयार केला आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर कॉलेज, शाळेच्या ओळखपत्रावर लस मिळणार हे आधीच स्पष्ट झाले होते. आता लसीकरणावेळी डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात ठेवणार असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. मुंबईत ३ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून, येथे ९ लाख २२ हजार ५१६ मुलांची नोंद आहे.

दरम्यान, मुलांचे लसीकरण करताना ‘वॉक इन’ लसीकरणावर भर दिला जाणार असला तरी कोविन अँपवर नोंदणी करणे गरजेचे आहे, तसेच या मुलांच्या लसीकरणात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक वॉर्डातील कॉलेज जवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीच्या मात्रा दिल्या जाणार आहेत. पालिका किंवा खाजगी लसीकरण केंद्रावर या मुलांचे लसीकरण करण्यापेक्षा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लसीकरण कॅम्प लावण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणा वेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम सुरू करण्याआधी १५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच विविध गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. कैद्यांकडे आधार कार्ड नसल्याने कारागृहाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे ही अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. तसेच झोपडपट्टीतील मुलांनी सुरुवातीला लसीकरण केंद्रावर नोंदणी करत लस घ्यावी. त्यानंतर लसीच्या मात्रा अधिक उपलब्ध झाल्यास त्यांच्या परिसरात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही काकाणी म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …